भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर येथे होणारी पाचवी कसोटी करोनामुळे पुढे ढकलण्यात आली. याबाबत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर लगेचच इंग्लंडचे तीन खेळाडू जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान आणि ख्रिस वोक्स यांनी आयपीएल २०२१ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यांची माघार ही मँचेस्टर कसोटीशी जोडली जात होती. पण वोक्सने आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. वोक्स म्हणाला, ”मला आयपीएलचा भाग व्हायचे होते. पण टी-२० वर्ल्डकपमुळे वेळ कमी होता.”

द गार्डियनशी बोलताना ख्रिस वोक्स म्हणाला, “टी-२० वर्ल्डकप आणि अ‌ॅशेस मालिकेमुळे आयपीएलमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप कमी वेळ होता. मला आयपीएलचा एक भाग व्हायचे होते, पण त्यासाठी मला काही द्यावे लागले असते. यामुळे मी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. आयपीएलचे वेळापत्रकही बदलण्यात आले. काही महिन्यांपूर्वी याविषयी काहीच माहिती नव्हती.”

हेही वाचा – विराट आणि धोनीमध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण?; वाचा जडेजानं दिलेलं उत्तर

वोक्स म्हणाला, ”टी-२० वर्ल्डकपनंतर अॅशेसची दीर्घ मालिका होणार आहे. करोनामुळे सर्वकाही पूर्वीसारखे सामान्य असणार नाही. पण हा हंगाम उत्साहवर्धक असणार आहे. आमच्या कुटुंबाला ऑस्ट्रेलियात क्वारंटाइनमध्ये राहावे लागू शकते का, हे आम्हाला अजून कळलेले नाही. येत्या काही दिवसात आम्हाला याबाबत संपूर्ण माहिती मिळेल.” अॅशेस मालिका ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

भारत-इंग्लंडमधील पाचवी कसोटी आयपीएलमुळे रद्द झाल्याचे वृत्त आले होते. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले, की खेळाडू करोनामुळे घाबरले होते. या कारणास्तव त्यांनी अंतिम कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता चालू मालिका संपली आहे. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये हा संघ अतिरिक्त सामने खेळू शकतो. कसोटी मालिकेत टीम इंडिया २-१ने पुढे होती.