इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाच पैकी चार सामने पार पडले. या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली. तर शेवटचा सामना करोना संकटामुळे टाळण्यात आला आहे. आता उर्वरित पाचवा सामन्यासाठी बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेटमध्ये खलबतं सुरु आहेत. शेवटचा सामना आता टी २० वर्ल्डकपनंतरच होईल असं सांगण्यात येत आहे. दरम्यान चार कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड मलान यानं भारतीय गोलंदाजीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. डेविड मलान या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघात खेळत होता. मलानने या मालिकेत चांगली फलंदाजी केली. मात्र फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांचा सामना करणं कठीण असल्याची कबुली त्याने दिली आहे. भारतीय गोलंदाज व्हेरिएशन करत असल्याचं त्याने सांगितलं. आपल्याला चेंडू समजला जेव्हा वाटतं तेव्हा तुमच्यासमोर नवीन प्रकारचं आव्हान असतं.

“मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगळ्या प्रकारचे गोलंदाज आहेत आणि जेव्हा ते एकत्र गोलंदाजी करतात तेव्हा त्यांना खेळणे खूप कठीण होते.”, असंही डेविड मलाननं सांगितलं. दुसरीकडे आर. अश्विनला संधी न दिल्याबद्दल मलानने आनंद व्यक्त केला आहे. “मी डावखुरा फलंदाज आहे आणि मला आनंद आहे की अश्विनला खेळवलं नाही. त्यामुळे माझा त्रास थोडा कमी झाला.”, असंही त्याने पुढे सांगितलं. तसेच आर. अश्विन जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, हे सांगायला तो विसरला नाही. पीटीआयशी बोलताना डेविड मलान याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

डेविड मलानने तिसऱ्या कसोटी सामन्यात १२८ चेंडूत ७० धावांची खेळी केली होती. या ११ चौकारांचा समावेश होता. तर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला होता. चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात मलान ३१ या धावसंख्येवर बाद झाला होता. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने त्याचा झेल घेतला होता. तर दुसऱ्या डावात मलान ५ या धावसंख्येवर धावचीत झाला होता.