दुखापतीच्या धक्क्यांतून सावरत योग्य समन्वय साधण्याचे आव्हान यजमान इंग्लंड संघासमोर असणार आहे. उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या इंग्लंडला मंगळवारी दुबळ्या अफगाणिस्तानशी सामना करणे जड जाणार नाही.

इंग्लंड संघाला दुखापतीच्या समस्या तीव्रतेने भेडसावत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाठीला झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार ईऑन मॉर्गनला मैदान सोडावे लागले होते. याच सामन्यात सलामीवीर फलंदाज जेसन रॉयचा मांडीचा स्नायू दुखावला होता.

मॉर्गन अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही, तर उपकर्णधार जोस बटलरकडे संघाचे नेतृत्व असेल. इंग्लंडची दुसरी फळीसुद्धा सशक्त आहे. यात टॉम करन आणि मोइन अली यांचा समावेश आहे. पाकिस्तानविरुद्ध धक्कादायक पराभवानंतर इंग्लंडने जोरदार मुसंडी मारली आहे. खेळाच्या तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्व सिद्ध करताना या संघाने बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला नामोहरम केले आहे.

दुसरीकडे, अफगाणिस्तानला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत अद्याप आपला पहिला विजय साकारता आलेला नाही. विश्वचषकाच्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धचे सामने गमावले आहेत. मात्र या सामन्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरणारी असल्यामुळे रशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्याकडून अफगाणिस्तानला आशा धरता येतील.

सामना क्र. २४

इंग्लंड वि. अफगाणिस्तान

स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंड, मँचेस्टर  ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

बेअरस्टोकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा

विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद झालेल्या जॉनी बेअरस्टोने पुढील तीन सामन्यांत ३२ (वि. पाकिस्तान), ५१ (वि. बांगलादेश) आणि ४५ (वि. वेस्ट इंडिज) इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोठय़ा खेळीत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जेसन रॉयच्या अनुपस्थितीत बेअरस्टोवर अधिक जबाबदारी असेल.

अफगाणिस्तानला चिंता फलंदाजीची

फलंदाजी ही अफगाणिस्तानची प्रमुख चिंता आहे. आतापर्यंतच्या एकाही सामन्यात या संघाला ४० षटकांपेक्षा अधिक काळ मैदानावर टिकाव धरता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर हझरतुल्ला झाझाई आणि नूर अली झादरान यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. परंतु त्याचा फायदा अन्य फलंदाजांना घेता आला नाही. अष्टपैलू खेळाडू रशिद खान वगळता एकालाही दोन आकडय़ांत धावा करता आल्या नाही.