पहिल्या डावात १६७ धावांत बाद होणाऱ्या इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात मात्र १ बाद २३४ अशी दमदार मजल मारली आहे. इंग्लंडचे ज्येष्ठ खेळाडू डेनिस कॉम्प्टन यांचा नातू असलेल्या निक कॉम्पटने झळकावलेले पहिलवहिले कसोटी शतक चौथ्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकनेही शतकी खेळी साकारत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना नामोहरम केले. न्यूझीलंडने ९ बाद ४६० धावसंख्येवर आपला डाव घोषित केला.  इंग्लंडचा संघ २९३ धावांनी पिछाडीवर होता. मात्र दोघांनी मुक्त फटकेबाजी करत २३१ धावांची सलामीची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीने इंग्लंडला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले. रविवारी कसोटीचा शेवटचा दिवस असून, इंग्लंडचा संघ अजूनही ५९ धावांनी पीछाडीवर असून त्यांच्या नऊ विकेट्स शिल्लक आहेत.  कुकला ट्रेंट बोल्टने बाद केले. कुकने १५ चौकारांसह ११६ धावा केल्या. भारत दौऱ्यात चांगली कामगिरी केलेल्या कॉम्प्टनने साऊदीच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत आपले कसोटीतील पहिले शतक साजरे केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॉम्प्टन १०२ तर नाइट वॉचमन स्टीव्हन फिन ० धावांवर खेळत आहेत.