श्रीलंका-इंग्लंड कसोटी मालिका

मोईन, रशीद आणि लीच यांची सुरेख गोलंदाजी; पाहुण्यांकडे एकूण १७७ धावांची आघाडी

फिरकीपटू मोईन अली, आदिल रशीद आणि जॅक लीच या तिघांनी मिळून केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात लंकेचा डाव अवघ्या २०३ धावांत गुंडाळल्यावर दुसऱ्या डावात पाहुण्यांच्या संघाने बिनबाद ३८ धावा करत एकूण आघाडी १७७ धावांपर्यंत वाढवली आहे.

पहिल्या डावात बेन फोक्सने झळकवलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३४२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २०३ धावांतच गारद झाला. मोईनने चार, तर रशीद आणि लीच यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

श्रीलंकेतर्फे अँजलो मॅथ्यूजने सर्वाधिक ५२ धावा करत प्रतिकार केला. मात्र इतर फलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. कर्णधार दिनेश चंडिमल (३३) आणि निरोशन डिकवेला (२८) यांनी संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

दिवसअखेर दुसऱ्या डावात इंग्लंडचे रॉरी बर्न्‍स आणि किटॉन जेनिंग्स अनुक्रमे ११ आणि २६ धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ९७ षटकांत सर्व बाद ३४२

श्रीलंका (पहिला डाव) : ६८ षटकांत सर्व बाद २०३ (अँजेलो मॅथ्युज ५२; मोईन अली ६६/४, आदिल रशीद २/३०)

इंग्लंड (दुसरा डाव) : १२ षटकांत बिनबाद ३८ (रॉरी बर्न्‍स खेळत आहे ११, किटॉन जेनिंग्स खेळत आहे २६).