इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली आहे. ब्रिस्टलमध्ये खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता १६७ धावा केल्या होत्या. सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर भारताच्या डावाला उतरती कळा लागली. २३१ धावांवर भारताचा पहिला डाव आटोपला असून इंग्लंडने भारताला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

ब्रिस्टलमध्ये भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांदरम्यान एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. हीदर नाइट (९५), सोफिया डन्कले (७४) आणि टॅमी ब्यूमॉन्ट (६६) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने त्यांनी पहिल्या डावात ९ बाद ३९६ धावांवर डाव घोषित केला.

हेही वाचा – भारतात धुमाकुळ घालणाऱ्या आणि इंग्लंडला रडवणाऱ्या ‘स्टार’ क्रिकेटपटूचा वनडे क्रिकेटला अलविदा!

 

प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने दुसर्‍या दिवसअखेर ५ बाद १८७ धावा केल्या. तिसर्‍या दिवशी मधल्या फळीप्रमाणेच भारताचे शेवटचे फलंदाजही बाद झाले. इंग्लंडकडून सोफी इक्लेस्टोनने ४ गडी बाद केले. चार दिवसांच्या सामन्यात फॉलोऑन देण्यासाठी १५० धावांचा फरक आवश्यक आहे. त्यानुसार, भारतीय महिला संघाला सामन्याच्या तिसर्‍या दिवशी किमान २४७ धावा पूर्ण कराव्या लागणार होत्या. मात्र त्याआधीच भारतीय संघ सर्वबाद झाला.