गुलाबी चेंडूनिशी प्रकाशझोतात झालेली तिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्यामुळे मोटेराच्या खेळपट्टीवरून वादंग माजला आहे. या पार्श्वभूमी वर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) कोणतीही कारवाई होऊ नये, याकरिता चौथ्या कसोटीसाठी फलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी खेळपट्टी उपलब्ध असेल.

अहमदाबादची तिसरी कसोटी जिंकून भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे लॉर्ड्सला १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी पात्र ठरण्याकरिता भारताला अखेरची कसोटी अनिर्णित राखली तरी पुरेशी ठरणार आहे. या परिस्थितीत फिरकीला पूर्णत: अनुकूल खेळपट्टी चौथ्या कसोटीसाठीही उपलब्ध करण्याची जोखीम भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पत्करणार नाही.

‘‘चौथ्या कसोटीमध्ये फलंदाजांचे वर्चस्व दिसून येईल. त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा सामना चाहत्यांना अनुभवता येईल,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.