नील वॅगनरचे पाच बळी

डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने (५/४४) दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि ६५ धावांनी धुव्वा उडवला.

या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून मालिकेतील दुसरा सामना २९ नोव्हेंबरपासून हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. कठीण परिस्थितीत संघाला सावरत द्विशतक साकारणाऱ्या बीजे वॉटलिंगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

रविवारच्या ३ बाद ५५ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडला पराभव टाळण्यासाठी आणखी २०७ धावांची आवश्यकता होती; परंतु वॅगनरच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचा दुसरा डाव १९७ धावांत आटोपला. कर्णधार जो रूट (११) आणि धोकादायक बेन स्टोक्स (२८) बाद झाल्यावर सॅम करनने (नाबाद २९) एकाकी खिंड लढवली.

 

आर्चरविरुद्ध वर्णभेदात्मक शेरेबाजी

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर सोमवारी न्यूझीलंडच्या चाहत्याकडून वर्णभेदात्मक शेरेबाजी करण्यात आली. बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना सीमारेषेजवळील एका चाहत्याने आर्चरच्या दिशेने हे शब्द उच्चारले. स्वत: आर्चरने या संदर्भात ‘ट्वीट’ करून इंग्लंड क्रिकेट मंडळाला याविषयी कल्पना दिली. दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने याप्रकरणी आर्चरकडे दिलगिरी प्रकट केली असून चाहत्यांनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंविरोधात वर्णभेदात्मक टिप्पणी करू नये, अशी विनंतीही केली आहे.

संक्षिप्त धावफलक

  • इंग्लंड (पहिला डाव) : ३५३
  • न्यूझीलंड (पहिला डाव) : २०१ षटकांत ९ बाद ६१५ (डाव घोषित)
  • इंग्लंड (दुसरा डाव) : ९६.२ षटकांत सर्व बाद १९७ (जो डेन्ली ३५, जोफ्रा आर्चर ३०; नील वॅगनर ५/४४).