करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेले काही महिने बंद होतं. तब्बल ४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मात्र लॉकडाउनपश्चात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयसीसीने काही नवीन नियम आखून दिले आहेत. ज्यामध्ये खेळाडूंना आणि गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाहीये. प्रादूर्भाव टाळण्यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा क्षेत्ररक्षक डोम सिबलेने चेंडू चमकवण्यासाठी अनावधानाने लाळेचा वापर केला. मात्र आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्यानंतर सिबलेने पंचांना याबद्दलची माहिती दिली. पंचांनीही तात्काळ तो चेंडू सॅनिटाईज केला.

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, मैदानावरील पंच खेळाडूंना किंवा गोलंदाजाला लाळेचा वापर करु नये यासाठी दोनवेळा सूचना देऊ शकतात. मात्र यानंतरही वारंवार असा प्रकार घडत असेल तर संघाला ५ धावांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंड आधीच ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यातच दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसरा दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे आता इंग्लंडच्या संघाला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.