इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस क्रिकेट मालिकेत बरोबरी राखण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियापुढे असेल. त्यासाठी अपयशी शेन वॉटसनऐवजी मिचेल मार्श या युवा खेळाडूला संधी देण्याची शक्यता आहे. या दोन संघांमधील दुसऱ्या सामन्याला गुरुवारी सुरुवात होत आहे. पहिला सामना जिंकल्यामुळे इंग्लंडचे मनोबल कमालीचे उंचावले असून हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.
पहिल्या कसोटीमध्ये वॉटसन दोन्ही डावांमध्ये फलंदाजीत अपयशी ठरला होता. ३४ वर्षीय वॉटसनऐवजी २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू मार्शचे पारडे जड मानले जात आहे. वॉटसनने कसोटीतील गेल्या १६ डावांमध्ये केवळ दोनच अर्धशतके केली आहेत. मार्शने या दौऱ्यातील केंट व इसेक्स या संघांविरुद्धच्या सराव सामन्यांमध्ये शतके झळकावली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने काही कौटुंबिक कारणास्तव दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्याऐवजी पीटर नेविलला संधी मिळणार आहे असून तो या सामन्यात पदार्पण करणार आहे. ऑस्ट्रेलियापुढे मिचेल स्टार्कच्या दुखापतीची समस्या असून तो खेळू शकला नाही तर त्याच्याऐवजी पीटर सिडलला पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे. त्यांचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्या मार्गदर्शनाचा त्यामध्ये मोठा वाटा होता. त्यांनी केलेले डावपेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरले आहेत. पहिल्या सामन्यात खेळलेल्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.
इंग्लंडचा विचार केल्यास जो रुट हा फलंदाजीमध्ये भन्नाट फॉर्मात असून त्याने कामगिरीमध्ये कलामीचे सातत्य दाखवले आहे. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, इयान बेल या अनुभवी खेळाडूंना अजूनही सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये जेम्स अ‍ॅण्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळालेली नाही. फिरकीपटू मोइन अलीने मात्र अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आपली छाप पाडली आहे.