06 August 2020

News Flash

कुमार जगज्जेतेपदासाठी आज घमासान

उपांत्य फेरीत ब्राझीलला पराभूत करणाऱ्या इंग्लंडचे पारडे जड मानले जात आहे.

उपांत्य फेरीत ब्राझीलला पराभूत करणाऱ्या इंग्लंडचे पारडे जड मानले जात आहे.

इंग्लंड-स्पेन पहिल्यांदाच विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज; रियान ब्रेवस्टर व अ‍ॅबेल रुईझ यांच्यावर नजरा

भारतात पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेवर शनिवारी पडदा पडेल. इंग्लंड आणि स्पेन या युरोप खंडातील बलाढय़ संघांमध्ये कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर जेतेपदाची चुरस रंगणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा कुमार विश्वचषक पटकावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत आणि त्यामुळे दर्जेदार खेळाचा आस्वाद या लढतीतून नक्की घेता येईल. युरोपियन कुमार अजिंक्यपद स्पर्धेची पुनरावृत्ती करण्यात स्पेन यशस्वी होतो की इंग्लंड सव्याज परतफेड करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रेक्षक व गोलसंख्येच्या बाबतीत या स्पर्धेने यापूर्वीचे सर्व विक्रम मागे टाकल्याने भारताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) स्पर्धा आयोजनासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशात कोलकाताच्या फुटबॉलप्रेमींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे इतर लढतींप्रमाणे अंतिम लढतीलाही कोलकातावासी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. ६६ हजार प्रेक्षकांसमोर कुमार विश्वचषक स्पर्धेला नवा जेता मिळणार आहे. इंग्लंड आणि स्पेन यांच्या कामगिरीकडे  लक्ष वेधले असता या लढतीत गोलवर्षांव अनुभवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या नावे सर्वाधिक १८ गोल आहेत, तर स्पेनने १५ गोल केले आहेत.

उपांत्य फेरीत ब्राझीलला पराभूत करणाऱ्या इंग्लंडचे पारडे जड मानले जात आहे. त्यात इंग्लंडचे बहुतेक सर्व सामने सॉल्ट लेक स्टेडियमवर झाल्यामुळे प्रेक्षकांचाही त्यांना पाठिंबा नक्की असेल. या स्पर्धेत अपराजित घोडदौड करणारा इंग्लंड हा एकमेव संघ आहे, तर स्पेनला साखळी फेरीत पहिल्याच लढतीत ब्राझीलकडून पराभव पत्करावा लागला होता. युरोपियन कुमार अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत उभय संघ तिसऱ्यांदा समोरासमोर आले आणि त्यात स्पेनने २००७ आणि २०१७ मध्ये बाजी मारली, तर इंग्लंडला २०१०मध्ये विजय मिळवण्यात यश आले आहे.

लक्षवेधी खेळाडू रियान ब्रेवस्टर (इंग्लंड)

उपांत्य फेरीत ब्राझीलविरुद्धच्या हॅट्ट्रिकनंतर रियान ब्रेवस्टर प्रकाशझोतात आला. या स्पर्धेत सलग दोन लढतींमध्ये त्याने प्रतिस्पर्धी संघाची बचावभिंत सहज भेदून हॅट्ट्रिक नोंदवली. इंग्लंडचा संघाला योग्य वेळी ब्रेवस्टरसारखा नायक सापडला. चौथ्या प्रयत्नांत इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळणार आहे आणि लिव्हरपूल क्लबच्या ब्रेवस्टरवर सर्वाच्या आशा आहेत. पाच सामन्यांत त्याने सात गोल नोंदवले असून गोल्डन बूटच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे.

अ‍ॅबेल रुईझ (स्पेन)

कर्णधार अ‍ॅबेल रुईझ हा स्पेनकडून सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू आहे. उपांत्य फेरीत मालीविरुद्ध त्याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर स्पेनने विजय मिळवला. त्याने सहा सामन्यांत सहा गोल नोंदवले आहेत. रुईझच्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर स्पेन चौथ्या प्रयत्नांत जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे.

आशा करतो की आम्ही जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरू. २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आम्हाला यश मिळाले आहे आणि तो विजय आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीतून इंग्लिश फुटबॉलचा स्तर किती उंचावला आहे, याची प्रचीती येते. अंतिम लढतीचा मनमुराद आनंद घेऊन आम्ही खेळणार आहोत.

 – जोएल लॅटिबीयूडीएरे, इंग्लंड संघाचा कर्णधार

युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत आम्ही इंग्लंडला पराभूत केले असले तरी आत्ताचा संघ प्रचंड बलाढय़ आहे. त्या पराभवानंतर इंग्लंड संघात बरेच बदल झाले आहेत आणि त्याची आम्हाला कल्पनाही नाही. दोन्ही संघांनी त्यानंतर बरीच सुधारणा केली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने खेळ करून त्यांना पुन्हा पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

– फेरान टोरेस, स्पेनचा खेळाडू

‘गोल’वीर

७ गोल

रियान ब्रेवस्टर (इंग्लंड)

६ गोल

लसाना एंडाये (माली),

अ‍ॅबेल रुईझ (स्पेन)

५ गोल

अ‍ॅमिने गॉयरी (फ्रान्स),

जॅन-फिएट अर्प (जर्मनी)

०२ क्रोएशिया येथे मे महिन्यात पार पडलेल्या युरोपियन १७ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत इंग्लंड आणि स्पेन समोरासमोर होते. मात्र स्पेनने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला होता. निर्धारित वेळेत हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड प्रयत्नशील आहे.

०९ इंग्लंड आणि स्पेन यांच्यापैकी कोणीही विजय मिळवल्यास कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाच्या यादीत नव्या संघाची नोंद होणार आहे. नायजेरिया, स्वित्र्झलड, मेक्सिको, ब्राझील, फ्रान्स, घाना, सौदी अरेबिया आणि सोव्हिएत रशिया यांनी कुमार विश्वचषक पटकावला आहे आणि शनिवारी नववा विजेता ठरणार आहे.

०४ स्पेनने कुमार विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा प्रवेश केला आहे. याआधी त्यांना १९९१, २००३ आणि २००७मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दुसरीकडे इंग्लंडची अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २००७ आणि २०११च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील पर्यंत मजल ही त्यांची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी होती.

६०० फूट लांब, १२० फूट रुंद कलाकृती

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला भारतीय संस्कृतीचा भाव देण्यासाठी कोलकाताच्या रस्त्यारस्त्यांवर रांगोळ्या रेखाटल्या आहेत. विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर (सॉल्ट लेक) ही अंतिम लढत होणार आहे आणि या स्टेडियमबाहेर दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मिळून ६०० फूट लांब व १२० फूट रुंद चित्र रेखाटले आहे. विविध रंगांमध्ये रंगलेल्या ठोकळ्यांच्या चित्रांनी एक भव्य वर्तुळ साकारण्यात आला असून त्याच्या केंद्रस्थानी फुटबॉल बनवण्यात आला आहे.

इंग्लंडसाठी अविश्वसनीय वर्ष

इंग्लंडच्या युवा फुटबॉलपटूंसाठी २०१७ हे वर्ष अविश्वसनीय ठरले आहे. त्यांनी फिफा २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा आणि यूएफा युरोपियन १९ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र, युरोपियन १७ वर्षांखालील स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या वर्षांत त्यांनी चार प्रमुख स्पर्धाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ब्राझील-माली यांच्यात कांस्यपदकाची लढाई

कुमार विश्वचषक स्पर्धेत चौथ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न संपुष्टात आल्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत माजी विजेत्या ब्राझीलला  गतउपविजेत्या मालीचा सामना करावा लागणार आहे. तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे विजयाने स्पर्धेचा निरोप घेण्याचा निर्धार दोन्ही संघांचा आहे.

अंतिम फेरी

इंग्लंड वि. स्पेन

स्थळ : विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, कोलकाता

आजचे सामने

*  वेळ : सायंकाळी ५ वा.

ब्राझील वि. माली

* वेळ : रात्री ८ वा.

इंग्लंड वि. स्पेन

* थेट प्रक्षेपण : इंग्रजी : सोनी

टेन २ व टेन २ एचडी, सोनी ईएसपीएन व ईएसपीएन एचडी; हिंदी व बंगाली : सोनी टेन ३ व टेन ३ एचडी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 5:51 am

Web Title: england spain clash in u17 world cup final
Next Stories
1 संग्रामला रौप्य, अमनप्रीतला पदार्पणात कांस्यपदक
2 युवा विश्वचषक आयोजनाचे भारताचे स्वप्न तूर्तास दूर?
3 प्रो-कबड्डीत अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज! तुमचा पाठींबा कोणाला?
Just Now!
X