गॉल : फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर इंग्लंडची आघाडीची फळी कोसळली. परंतु पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी ७४ धावांची आवश्यकता असलेल्या इंग्लंडने ३ बाद ३८ धावा केल्या असून, त्यांना सोमवारी अखेरच्या दिवशी फक्त ३६ धावांची गरज आहे.

पहिल्या डावातील द्विशतकवीर जो रूटला निरोशान डिक्वेलाने फक्त एक धावेवर धावचीत केले. डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ ईम्बुलडेनियाने १३ धावांत दोन बळी घेतले. खेळ थांबला तेव्हा, जॉनी बेअरस्टो ११ आणि पदार्पणवीर डॅन लॉरेन्स ७ धावांवर खेळत होते.

त्याआधी, श्रीलंकेचा दुसरा डाव ३५९ धावांत संपुष्टात आला. यात लाहिरू थिरिमानेचे (१११) शतक आणि अँजेलो मॅथ्यूजच्या ७१ धावांचा समावेश होता. इंग्लंडकडून जॅक लीचने १२२ धावांत ५ बळी घेतले.