11 July 2020

News Flash

इंग्लंडची अनपेक्षित घोडदौड

उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील आणि जर्मनी यांच्यातील लढत सर्वाधिक चर्चेचा विषय बनली होती.

इंग्लंडचा संघ  

ब्राझील व स्पेन यांना अंतिम फेरीसाठी पसंती; आश्चर्याचा धक्का देण्यास माली सज्ज

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेची चुरस अंतिम टप्प्यात आली आहे. युरोपातील दोन, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील प्रत्येकी एक अशा एकूण चार संघांमध्ये उपांत्य फेरीची लढाई रंगणार आहे. ब्राझील आणि स्पेन यांनी अपेक्षित कामगिरी करताना जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये स्वत:चे स्थान कायम राखले आहे. मात्र इंग्लंडची घोडदौड ही सर्वाना अचंबित करणारी ठरली आहे आणि त्यात गतउपविजेत्या माली आश्चर्याचा धक्का देण्याची दाट शक्यता आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठीच्या चढाओढीत स्पेन आणि माली, तर इंग्लंड आणि ब्राझील समोरासमोर येणार आहेत. सातत्यपूर्ण खेळाबरोबरच चतुर चाली करणारे दोन संघ जेतेपदाच्या शर्यतीसाठी पात्र ठरणार आहेत.

उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील आणि जर्मनी यांच्यातील लढत सर्वाधिक चर्चेचा विषय बनली होती. या दोन्ही संघांतील खेळाडूंना लहान वयातच फुटबॉलचे बाळकडू पाजले जाते. ब्राझीलच्या नसानसांत फुटबॉल भिनला असला तरी त्याला कौशल्याची जोड जर्मनीत दिली जाते. त्यामुळेच या मातबर संघांमध्ये होणारा सामना हा फुटबॉलरसिकांसाठी पर्वणीच. पण अपेक्षेनुसार ही लढत रोमहर्षक झाली नाही. पहिल्या सत्रातील पिछाडी भरून काढताना ब्राझिलने केलेले पुनरागमन हे या लढतीचे वैशिष्टय़ ठरले. मात्र उपांत्य फेरीत ब्राझीलला युरोपातीलच इंग्लंड संघाविरुद्ध थोडा सावध खेळ करावा लागेल. इंग्लंडने पाच सामन्यांत १५ गोल केले आहेत आणि उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अमेरिकेवर ४-१ असा मोठा विजय मिळवला आहे. ब्राझीलच्या बचावपटूंकडून उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या चुका इंग्लंडविरुद्ध महागात पडू शकतात. ब्राझीलला पाच सामन्यांत केवळ ११ गोल करता आलेले आहेत. इंग्लंडच्या बचावपटूंनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धीना केवळ तीनच गोल करण्यात यश मिळाले आहेत, तर ब्राझीलविरुद्ध दोन गोल करता आले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या या लढतीत बचावपटूंची कसोटी लागणार आहे. इंग्लंडचा आक्रमणपटू रियान ब्रेवस्टर हा ब्राझीलसाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्याला टक्कर देण्यासाठी पॉलिन्हो आणि ब्रेनर सज्ज आहेत.

युरोप आणि आफ्रिका यांच्यातील रंगतदार लढतीचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांना स्पेन आणि माली यांच्या लढतीची मेजवानी आहे. स्पध्रेत आतापर्यंत सर्वाधिक आक्रमक संघ म्हणून मालीने वर्चस्व राखले आहे. स्पेन या यादीत जर्मनी आणि इराणनंतर चौथ्या क्रमांकावर येतो. पण त्याच वेळी स्पेनने प्रतिस्पर्धी संघांना गोल करण्यापासून अनेक वेळा वंचित ठेवले आहे. त्यामुळे हा सामना सर्वोत्तम आक्रमण विरुद्ध अभेद्य बचाव असा असणार आहे. मालीने पाच सामन्यांत १५ गोल केले आहेत, तर स्पेनच्या नावावर ११ गोल आहेत. मालीचा लसाना एंडाये आणि स्पेनचा अ‍ॅबेल रुईझ यांच्यात गोल करण्यासाठी रंगणारी चढाओढ पाहण्यासारखी असणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत मालीला आफ्रिकेतीलच प्रतिस्पर्धी घानावर विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता, तर स्पेनने आशियाई संघ इराणवर सहज विजय मिळवला होता.

उपांत्य फेरी गुवाहाटीऐवजी कोलकात्यामध्ये रंगणार

नवी दिल्ली: कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गुवाहाटीमध्ये होणारी ब्राझील आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीतील लढत मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे कोलकातामध्ये खेळवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. नियोजित वेळापत्रकानुसार, २५ ऑक्टोबर रोजी होणारी ही लढत गुवाहाटीतील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटीक्स स्टेडियममध्ये होणार होती. मात्र काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य नसल्याने ही उपांत्य लढत कोलकात्यातील युवा भारती क्रीडांगणावर सायंकाळी पाच वाजता खेळवली जाणार आहे.

मानसिक तंदुरुस्ती हेच ब्राझीलच्या यशाचे गमक

कोलकाता : जर्मनीचा संघ बलाढय़ मानला गेला होता. पण त्यांच्याविरुद्ध आमच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत मानसिक कणखरता व तंदुरुस्ती दाखवली. त्यामुळेच आम्हाला विजय मिळविता आला, असे ब्राझील फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कालरेस अमादेऊ यांनी सांगितले. ब्राझीलने जर्मनीवर २-१ अशी मात करीत कुमार विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.

जर्मनीच्या प्रशिक्षकांची टीका अयोग्य -बुसाका

कोलकाता : कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील संघाकडून १-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर जर्मनीचे प्रशिक्षक ख्रिस्तियन वुईक यांनी पंचांवर केलेली टीका अयोग्य आहे, असे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे प्रशिक्षक मसिमो बुसाका यांनी सांगितले. सामना संपल्यानंतर ब्राझीलच्या खेळाडूंचे अभिनंदन करताना वुईक यांनी सामन्यातील अमेरिकन पंच जेअर मरुफो यांच्यावर टीका केली होती. आपल्या संघाला पेनल्टी किक त्यांनी दिली नाही, असे त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2017 12:34 am

Web Title: england success in fifa u17 world cup
Next Stories
1 Pro Kabaddi Season 5 – गतविजेत्या पाटण्याकडून हरियाणाचा धुव्वा
2 Pro Kabaddi Season 5 – अटीतटीच्या लढाईत पुण्याची उत्तर प्रदेशवर मात, दीपक हुडा-गिरीश एर्नेक चमकले
3 सेहवाग टेलरला म्हणाला ‘दर्जी’; ट्विटरवर रंगली शाब्दिक जुगलबंदी
Just Now!
X