24 November 2017

News Flash

नाक कापलं!

* तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ७ विकेट राखून विजय * इंग्लंडची मालिकेत २-१ अशी

पी.टी.आय. कोलकाता | Updated: December 10, 2012 12:55 PM

*  तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ७ विकेट राखून विजय
*  इंग्लंडची मालिकेत २-१ अशी आघाडी
* कुक ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी
‘‘आम्ही वाईट खेळलो, खेळपट्टीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही,’’ असे भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग शनिवारी सायंकाळीच म्हणाला होता. त्याच्या विधानात नक्कीच तथ्य होते. पण हे सत्य स्वीकारणाऱ्या वीरूने कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या ‘खेळपट्टी’ या जखमेलाच नकळत स्पर्श केला. वानखेडेची फिरकीला अनुकूल खेळपट्टी असो किंवा ईडन गार्डन्सची पाटा खेळपट्टी असो.. भारतीय संघ दोन्ही परीक्षांमध्ये नापास झाला, तर इंग्लिश संघ दोन्ही परीक्षांत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला. धोनीचा ‘मिडासटच’ आता संपलेला आहे, याची पुरती जाणीव क्रिकेटरसिकांना झालेली आहे. मुंबईपाठोपाठ कोलकात्यावरही इंग्लिश संघाने वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे आता नागपूरची कसोटी जिंकून मालिका वाचविण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही. कारण तिसऱ्या कसोटीत ७ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.

रविवारी सकाळी भारताच्या दुसऱ्या डावाला २४७ धावांवर पूर्णविराम दिल्यानंतर इंग्लंडपुढे विजयासाठी फक्त ४१ धावांचे आव्हान होते. पण पाहुण्या संघाचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. मात्र तरीही दोन सत्रे शिल्लक असतानाच इंग्लंडने सामना जिंकला. एका तपानंतर ईडन गार्डन्सवर भारताच्या पदरी पराभव आला. तीन तास दोन मिनिटे खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करणारा अश्विन ९१ धावांवर नाबाद राहिला. भारताचा डावाने पराभव अश्विनच्याच जिगरबाद फलंदाजीमुळे टळला.
कप्तान अ‍ॅलिस्टर कुक (१), जोनाथन ट्रॉट (३) आणि केव्हिन पीटरसन (०) हे तीन फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे इंग्लंडची ३ बाद ८ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. पण इयान बेलने (नाबाद २८) संघाला विजयापर्यंत नेले. बेलने आर. अश्विनला एकेरी धाव काढत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लिश खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये तसेच मैदानावर फेरी मारून आपला जल्लोष साजरा केला. सलग तिसरे शतक साकारणारा कुक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या विजयानिशी भारतीय भूमीवर तब्बल २८ वर्षांनतर कसोटी मालिका विजयाच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. १९८४-८५मध्ये डेव्हिड गोवरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली होती.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तीन बळी घेत आशेचे किरण जरी दाखवले तरी पहिल्या डावात मात्र भारतीय गोलंदाजी सपशेल अपयशी ठरली. इंग्लिश गोलंदाजांनी मात्र येथील वातावरणाचा चांगला फायदा उचलला.
मुंबईत इंग्लिश संघाने १० विकेट राखून विजय मिळवला होता, त्यानंतर यजमान संघाने पुन्हा कोलकात्यामध्ये निराशा केली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये अपयशी ठरणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंच्या संघातील स्थानाबाबत त्यामुळेच प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
आता १३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ नागपूरला रवाना होतील. इंग्लंडला मालिका विजयाचे ऐतिहासिक स्वप्न स्वीकारण्यासाठी हा सामना किमान अनिर्णीत राखणे आवश्यक आहे. तथापि, मायभूमीवर मालिकेत पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायला हवा.
धावफलक
भारत (पहिला डाव) : ३१६
इंग्लंड (पहिला डाव) : ५२३.
भारत (दुसरा डाव) : (९ बाद २३९वरून पुढे) आर. अश्विन नाबाद ९१, प्रग्यान ओझा त्रिफळा गो. अँडरसन ३, अवांतर (बाइज-८, लेगबाइज-२) १०, एकूण ८४.४ षटकांत सर्व बाद २४७.
बाद क्रम : १-८६, २-९८, ३-१०३, ४-१०७, ५-१२२, ६-१२२, ७-१५५, ८-१५९, ९-१९७, १०-२४७.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १५.४-४-३८-३, स्टीव्हन फिन १८-६-४५-३, मॉन्टी पनेसार २२-१-७५-१, ग्रॅमी स्वान २८-९-७०-२, समित पटेल १-०-९-०.
इंग्लंड (दुसरा डाव) : अ‍ॅलिस्टर कुक यष्टीचीत धोनी गो. अश्विन १, निक कॉम्प्टन नाबाद ९, जोनाथन ट्रॉट पायचीत गो. ओझा ३, केव्हिन पीटरसन झे. धोनी गो. अश्विन ०, इयान बेल नाबाद २८, एकूण १२.१ षटकांत ३ बाद ४१
बाद क्रम : १-४, २-७, ३-८
गोलंदाजी : आर. अश्विन ६.१-१-३१-२, प्रग्यान ओझा ६-३-१०-१.   

First Published on December 10, 2012 12:55 pm

Web Title: england take 2 1 lead with seven wicket win at eden