जेम्स अँडरसन आणि जोनाथन ट्रॉट यांना विश्रांती
ख्रिस वोक्स आणि जोस बटलर यांना संधी
 ट्वेन्टी-२० मालिकेसाठी जो रूटचा समावेश
पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भरवशाचा फलंदाज जोनाथन ट्रॉट यांना विश्रांती दिली आहे. त्यांच्याऐवजी ख्रिस वोक्स आणि जोस बटलर यांना संधी देण्यात आली आहे. याचप्रमाणे दोन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी इंग्लिश संघात युवा फलंदाज जो रूटचा समावेश करण्यात आला आहे.
पहिला ट्वेन्टी-२० सामना गुरुवारी पुण्यात आणि दुसरा सामना शनिवारी मुंबईमध्ये खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर पाहुणा इंग्लंडचा संघ नाताळच्या सुट्टीसाठी मायदेशी परतणार आहे. त्यानंतर ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ पुन्हा भारतात येणार आहे. पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी अँडरसनची आधी इंग्लंडच्या संघात निवड झाली होती. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीमुळे इंग्लंडला परतल्यामुळे ईऑन मॉर्गनकडे ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
ट्वेन्टी-२० संघ : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, डॅनी ब्रिग्स, जोस बटलर, जेड डर्नबॅक, अ‍ॅलेक्स हेल्स, मायकेल लम्ब, स्टुअर्ट मेकर, समित पटेल, जेम्स ट्रेडवेल, ल्युक राइट, जो रूट, जेम्स हॅरिस.
एकदिवसीय संघ : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, इयान बेल, टिम ब्रेसनन, डॅनी ब्रिग्स, जेड डर्नबॅक, स्टीव्हन फिन, क्रेग किस्वेटर, स्टुअर्ट मेकर, ईऑन मॉर्गन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स, जोस बटलर.