दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर एक डाव आणि ५५ धावांनी विजय मिळवून दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली आहे. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या १३४ धावात संपुष्टात आला. दुसऱ्या डावात सलामीवीर इमाम उल हक (३४) आणि उस्मान सलाउद्दीन (३३) या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी इंग्लंडच्या धारदार गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली.

ख्रिस ब्रॉड आणि बेसने प्रत्येकी तीन तर अँडरसनने दोन विकेट काढल्या. पहिल्या डावात इंग्लंडकडे १८९ धावांची आघाडी होती. पाकिस्तानने पहिल्या डावात १७४ धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव ३६३ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक नाबाद (८०) धावा केल्या.

इंग्लंडच्या पहिल्या डावात सर्व फलंदाजांनी आपापल्यापरीने संघासाठी योगदान दिलं. अॅलिस्टर कूक (४६) आणि केटॉन जेनिंग्ज जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जेनिंग्ज माघारी परतल्यानंतर कूकने कर्णधार जो रुटसोबत (४५) संघाचा डाव सावरला. डॉमनिक बेसने (४९) धावा केल्या. इंग्लंडकडून सर्वाधिक ८० धावा करणाऱ्या जोस बटलरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बासला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.