भारताविरुद्धच्या कसोटी लढतीवर इंग्लंडच्या एक हजाराव्या सामन्याची मोहोर

क्रिकेटचा सामना व ऐतिहासिक विक्रम याचे अतूट नाते असते. भारताविरुद्ध एजबस्टन येथे होणारा पहिला कसोटी सामना यजमान इंग्लंडसाठी पुरुष विभागातील एक हजारावा कसोटी सामना असणार आहे. या सामन्यास बुधवारी प्रारंभ होत आहे.

इंग्लंडने १८७७ मध्ये मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यांचा हा पहिलाच कसोटी सामना होता. त्यानंतर आजपर्यंत ते ९९९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ३५७ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळविला आहे तर २९७ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ३४५ सामने अनिर्णित राहिले आहेत.

एजबस्टन येथे १९०२ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाबरोबरचा हा सामना मे महिन्यात झाला होता. आजपर्यंत  तेथे इंग्लंडने पन्नास कसोटी सामने खेळले असून त्यापैकी २७ सामने त्यांनी जिंकले असून आठ सामन्यांमध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. पंधरा सामने अनिर्णित राहिले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) इंग्लंडला या महोत्सवी सामन्याबद्दल अभिनंदन करीत शुभेच्छा पाठविल्या आहेत. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी म्हटले आहे, इंग्लंडसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. आजपर्यंत एक हजार कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी क्रिकेट जगताला अनेक दिग्गज फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक दिले आहेत. त्यांच्याकडून यापुढेही असेच कीर्तिवान खेळाडू घडतील अशी आम्हाला खात्री आहे. कसोटी हे क्रिकेटमधील अतिशय पारंपरिक तरीही सतत हवेहवेसे असणारे स्वरूप आहे.

या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीच्या अव्वल श्रेणी पंच मंडळातील वरिष्ठ सदस्य व न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो हे आयसीसीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रिव्ह्ज यांचा रौप्य सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे. हा समारंभ कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी आयोजित केला जाणार आहे.

भारताविरुद्ध इंग्लंडने १९३२ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यासह इंग्लंडने आतापर्यंत ११७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ४३ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळविला असून २५ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळविता आला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. घरच्या मैदानावर इंग्लंडने तीस सामन्यांमध्ये भारताला पराभूत केले आहे. इंग्लंडमध्ये भारताची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. केवळ सहा सामन्यांमध्ये त्यांनी विजयश्री संपादन केली आहे. एकवीस सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत व इंग्लंड यांच्यात एजबस्टन येथे सहा कसोटी सामने झाले असून त्यापैकी पाच सामने इंग्लंडने जिंकले आहेत व एक सामना अनिर्णित राहिला आहे.