गेल्या काही दिवसांपासून एक बडा संघ पाकिस्तानात क्रिकेट मालिका खेळणार असल्याचे बोलले जात होते. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले असून तब्बल १६ वर्षांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंड संघ पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. कराचीमध्ये १४ आणि १५ ऑक्टोबरला दोन टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करून दिली.

इंग्लंडचा संघ १२ ऑक्टोबरला पाकिस्तानमध्ये दाखल होईल. त्यानंतर १४ आणि १५ ऑक्टोबरला दोन टी२० सामने कराची येथे खेळले जातील. ही मालिका झाल्यानंतर लगेचच दोन्ही संघ १६ ऑक्टोबरला टी२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतामध्ये दाखल होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की गेल्या महिन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडला जानेवरी २०२१ मध्ये एका छोट्या क्रिकेट दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने हे आमंत्रण मंगळवारी (१७ नोव्हेंबर) स्विकारले. मात्र जानेवारीमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या मालिका असल्याने त्यांनी ऑक्टोबरमध्ये हा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.