भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांना आलेल्या सपशेल अपयशामुळे ३० ऑगस्टपासून साऊदम्प्टन येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी हॅम्पशायरच्या जेम्स व्हिन्सची इंग्लंडच्या १४ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. इंग्लंडच्या निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ यांनी यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोला पर्याय म्हणून व्हिन्सला संघात स्थान देण्यात आल्याचे जाहीर केले.

तिसऱ्या कसोटी सामन्यात बेअरस्टोच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याने यष्टीरक्षण अर्धवटच सोडले होते. त्यामुळे चौथ्या कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त न झाल्यास व्हिन्सचे अंतिम ११ खेळाडूंमधील स्थान निश्चित होईल.

२७ वर्षीय व्हिन्सने एप्रिलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. याव्यतिरिक्त, इसेक्सचा वेगवान गोलंदाज जॅमी पोर्टरला कौंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी एखाद्या गोलंदाजाला इजा झाल्यास त्याला पुन्हा बोलवण्यात येईल.

जो रूट (कर्णधार), अ‍ॅलिस्टर कुक, किटॉन जेनिंग्स, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, बेन स्टोक्स, ऑलिव्हर पोप, मोईन अली, आदिल रशीद, सॅम करन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, जेम्स व्हिन्स.