करोना विषाणूचा सामना करण्यासाठी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद आहे. मात्र जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होणं जवळपास निश्चित आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखलही झाला. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संघ इंग्लंडसाठी प्रयाण करत असल्याचा एक छोटा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता.

क्रिकेट खेळणारे इतर देश अजूनही दुसऱ्या देशांचे दौरे करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. भारतीय संघाचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील दौरेदेखील रद्द करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजच्या संघाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंदर्भात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने बीबीसीशी बोलताना मत व्यक्त केलं. “खूप लोक क्रिकेट खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी आतुर होती. आमचं धाडसी निर्णय घेत इंग्लंडला येणं म्हणजे आम्हाला ‘बळीचा बकरा’ बनायचं आहे असं अजिबात नाही. आमचा इंग्लंड दौरा नियोजित होता. फक्त तारखा थोड्या बदलल्या. जेव्हा दौऱ्याची तयारी करण्यास सुरूवात झाली, तेव्हा संघातील सारेच सदस्य खेळण्यासाठी उत्सुक होते. आणि म्हणूनच आता आम्ही येथे (इंग्लंडमध्ये) आहोत”, असे होल्डर म्हणाला.

वेस्ट इंडिजचा नियोजित इंग्लंड दौरा हा जून महिन्यात होता. पण करोनाच्या तडाख्यामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार आता ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. ICC च्या नव्या नियमांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने मालिका सुरू होण्याच्या महिनाभर आधीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यावर जाण्यासाठी वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडूंनी नकार दिला होता. त्यानंतर त्या खेळाडूंना वगळून क्रिकेट मंडळाने या मालिकेसाठी आपला १५ जणांचा संघ जाहीर केला.

वेस्ट इंडिजचा संघ – जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शेनॉन गॅब्रिअल

कसोटी मालिकेचं वेळापत्रक –

८ ते १२ जुलै – पहिली कसोटी (एजेस बाऊल)
१६ ते २० जुलै – दुसरी कसोटी (ओल्ड ट्रॅफर्ड)
२४ ते २८ जुलै – तिसरी कसोटी (ओल्ड ट्रॅफर्ड)