आज जिगरबाज बांगलादेशशी सामना

यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला चारीमुंडय़ा चीत करीत विश्वचषक क्रिकेट अभियानाला झोकात सुरुवात केली, परंतु पाकिस्तानकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शनिवारी कार्डिफ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक संघ म्हटल्या जाणाऱ्या बांगलादेशविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे.

२०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत बांगलादेशकडून १५ धावांनी पराभव पत्करल्यामुळे इंग्लंडला गटसाखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने केला आहे. मागील विश्वचषकानंतर इंग्लंड क्रिकेट मंडळाचे संचालक अँडय़ू स्ट्रॉस यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना आखल्या. पीटर मूर्स यांच्या जागी ट्रेव्हर बेलिस यांची प्रशिक्षकपदावर नियुक्ती केल्यापासून इंग्लंडचा आलेख उंचावला आहे.

विश्वविजेतेपदाचे उद्दिष्ट समोर ठेवत इंग्लंडने ओव्हलवर दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मग पाकिस्तानने त्यांच्यावर १४ धावांनी मात केली. या सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंना संयम राखणे कठीण गेले. सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांना मैदानावरील गैरवर्तनाबद्दल दंड ठोठावण्यात आला.

इंग्लंडची भिस्त रूटवर

सध्या विश्वचषकातील सर्वाधिक एकूण धावा यॉर्कशायरच्या जो रूटच्या नावावर आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयात अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या रूटने पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करताना शानदार शतक साकारले. त्यामुळेच इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रूटवर आहे. वेगवान आणि फिरकी मारा खेळण्याची रूटकडे उत्तम क्षमता आहे.

प्लंकेटला संधी मिळणार

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चर महागडा ठरला होता. १० षटकांत ७९ धावा देणाऱ्या आर्चरला एकही बळी मिळाला नव्हता. त्यामुळे वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेटला संघात स्थान मिळू शकते. त्यामुळे आर्चर किंवा मार्क वूड यापैकी एकाला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

धक्कादायक निकालाबाबत मोर्तझा आशावादी

सोफिया गार्डन्स मैदानावर बांगलादेशने ऐतिहासिक विजय मिळवला होता. २००५मध्ये त्यांनी चक्क विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवण्याची किमया साधली होती. त्या सामन्यात पाच बळी मिळवणारा मश्रफी मोर्तझा आता बांगलादेशचे नेतृत्व करीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या आव्हानासाठी बांगलादेशचा संघ सज्ज झाला आहे. ‘‘इंग्लंडला विश्वचषकाचे दावेदार मानले जात आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान सोपे नसेल. परंतु आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केल्यास धक्कादायक निकाल नोंदवू शकतो,’’ असा विश्वास मोर्तझाने व्यक्त केला.

बांगलादेशला चिंता तमिमची

सलामीवीर तमिम इक्बाल धावांसाठी झगडत आहे, ही बांगलादेशसाठी चिंतेची बाब आहे. गेल्या काही वर्षांत बांगलादेशच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या तमिमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ आणि न्यूझीलंडविरुद्ध २४ धावाच करता आल्या आहेत. परंतु डावखुऱ्या तमिमने इंग्लंडविरुद्धच्या मागील सामन्यात १२८ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळेच त्याच्याकडे आशेने पाहिले जात आहे.

पाकिस्तानविरुद्ध आम्ही क्षेत्ररक्षणात क्षुल्लक चुका केल्या. परंतु बांगलादेशविरुद्ध त्या चुकांची पुनरावृत्ती टाळू. पराभवामुळे आम्ही कोठे कमी पडत आहात, याची जाणीव झाली. आम्ही दमदार पुनरागमन करू!  – इऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

न्यूझीलंडविरुद्ध आम्हाला विजयाने हुलकावणी दिली. परंतु इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू. त्यामुळे इंग्लंडनी आम्हाला कमी लेखू नये.     – मुशफिकर रहिम, बांगलादेशचा फलंदाज