News Flash

Ind vs Eng : पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण लांबणार?

अंतिम कसोटीसाठी हनुमा विहारी, रविंद्र जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता

ओव्हलच्या मैदानात खेळवला जाणार अंतिम सामना

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, भारतीय संघ शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात बदल करण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पृथ्वी शॉला अखेरच्या कसोटीसाठी भारतीय संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. सलामीवीर लोकेश राहुलच्या जागी पृथ्वीची भारतीय संघात वर्णी लागणार असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र अजुनही संघ व्यवस्थापनाने पृथ्वीला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळण्याबद्दल हिरवा कंदील दाखवलेला नसल्याचं कळतंय.

पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाने सराव करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी लोकेश राहुल चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसोबत स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव करताना दिसला. त्यामुळे अखेरच्या कसोटीसाठी पृथ्वी शॉला संघात जागा मिळेल याची शक्यता आता मावळताना दिसते आहे. मात्र दुसरीकडे हनुमा विहारीला भारतीय संघात जागा मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी हनुमा विहारीला संधी देऊन भारतीय संघ व्यवस्थापन संघाचा फलंदाजीचा पर्याय आणखी बळकट करण्याची शक्यता आहे. हनुमा विहारीही सरावादरम्यान फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत चर्चा करताना दिसला.

याचसोबत भारतीय संघातील एकमेव फिरकीपटू रविचंद्रन आश्विनलाही अंतिम कसोटीसाठी विश्रांती देऊन रविंद्र जाडेजाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. चौथ्या कसोटीत आश्विनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. विशेषकरुन फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर आश्विनचं अपयश अनेकांच्या डोळ्यात भरलं होतं. ज्या खेळपट्टीवर मोईन अलीसारखे कामचलाऊ फिरकीपटू यशस्वी होतात, तिकडे आश्विनला चांगली कामगिरी न करता आल्याने भारताच्या पराभवासाठी आश्विन जबाबदार असल्याचं वक्तव्यही हरभजनसिंहने केलं होतं. यामुळे अंतिम सामन्यासाठी रविंद्र जाडेजाला संघात जागा दिली जाऊ शकते. ४-१ ने कसोटी मालिका गमावण्याऐवजी ३-२ ने पराभव स्विकारुन दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2018 12:58 pm

Web Title: england vs india 2018 hanuma vihari and ravindra jadeja in line to play the fifth test prithvi shaw likely to miss
Next Stories
1 ISSF World Championship : सौरभ चौधरीला पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक
2 Asian Games 2018 : बाबांच्या गळ्यात सुवर्णपदक घालायचं होतं, मात्र सगळंच संपलं!
3 Ind vs Eng : चौथ्या कसोटीतला पराभव आश्विनमुळे – हरभजन सिंह
Just Now!
X