इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंड विरूद्ध आयर्लंड कसोटी सामन्यात आयर्लंडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडने आयर्लंडसमोर विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 38 धावांवर बाद झाला. इंग्लंडने या कसोटी सामन्यात आयर्लंडचा 143 धावांनी पराभव केला. कसोटी सामन्यात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणाच्या लाजीरवाणा विक्रम आता आयर्लंडच्या नावावर झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी वेस्ट इंडिज विरूद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संपूर्ण संघ 43 धावांवर बाद झाला होता. 116 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासातील ती सर्वात कमी धावसंख्या ठरली होती.

विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडाली होती. नाणेफेक जिंकून कर्णधार जो रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु आयर्लंडच्या गोलंदाजीपुढे पहिल्या डावात इंग्लंडचा संघ केवळ 85 धावांवर तंबूत परतला. आयर्लंडच्या टिम मुर्ताघने पाच फलंदाजांना माघारी धाडत इंग्लंडच्या संघाचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर आयर्लंडने 85 धावांचा पाठलाग करत पहिल्या डावात 207 धावा केल्या. आयर्लंडसाठी अँन्ड्र्यू बल्बिर्नीने सर्वाधिक 55 धावा केल्या होत्या.

इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात जॅक लिच आणि जेसन रॉय यांच्या जोरावर 303 धावा केल्या. जॅक लिचने सर्वाधिक 92 तर जेसन रॉयने 72 धावा करत इंग्लंडला 303 धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडने आयर्लंडसमोर केवळ 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु 182 धावांचे लक्ष्य पार करताना सुरूवातीपासूनच आयर्लंडचा डाव अडखळत सुरू झाला. आयर्लंडचे सर्वच खेळाडू स्वस्तात तंबूत परतले. दुसऱ्या डावात जेम्स मॅक्कलमने सर्वाधिक 11 धावा केल्या. इंग्लंडचा गोलंदाज क्रिस वोक्सच्या भेदक माऱ्यापुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नागी टाकली. क्रिस वोक्सने 7.4 षटकांत 17 धावा देत आयर्लंडचे सहा गडी बाद केले. क्रिस वोक्सच्या भेदक माऱ्यापुढे आयर्लंडच्या अवघा संघ 38 धावांवर बाद झाला.