वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारताच्या महिला संघाचा दोन विकेटने पराभ केला आहे. तीन सामन्याची मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने निर्वादित वर्चस्व गाजवले होते. मात्र, अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत शेवट गोड केला आहे. महाराष्ट्राच्या स्मृती मानधना आणि पूनम राऊत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर महिला संघाने इंग्लंडसमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या इंग्लंडने ४९ व्या षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्याच षटकात सलामीची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज बाद झाली. त्यानंतर पूनम राऊत आणि स्मृती मानधना यांनी शतकी भागिदारी केली. मानधनाने ७४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. पुनम राऊतने ९७ चेंडूत संयमी ५६ धावांची खेळी केली. कर्णधार मिताली राज आपल्या लौकिकास खेळी करण्यात अपयशी ठरली. अखेरच्या काही षटकांमध्ये दिप्ती शर्माने २७ तर शिखा पांडेने केलेल्या २६ धावांमुळे भारताला २०० धावांचा टप्पा पार करता आला.

प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या इंग्लंडची सलामी जोडी झुलन गोस्वामीने फोडली. झुलनने ३३ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. इंग्लंडच्या डॅनिअल वॅटने अर्धशतक करून इंग्लंडला सावरले. मात्र शिखा पांडेने तिला तंबूत धाडून भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. त्यानंतर जॉर्जिया एल्वीसीसने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत सावध खेळ करून इंग्लंडला विजय मिळवून दिला.