भारत-इंग्लंड सराव सामना

मुंबई : डावखुरी वेगवान गोलंदाज कोमल झांझडने केलेल्या चमकदार कामगिरीनंतरही भारतीय महिला संघाला इंग्लंडविरुद्धच्या एकमेव क्रिकेट सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने १५५ धावांचे लक्ष्य आठ गडय़ांच्या मोबदल्यात गाठून भारतावर दोन गडी व ७५ चेंडू राखून विजय मिळवला.

२२ फेब्रुवारीपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव ४९ षटकांत १५४ धावांत संपुष्टात आला. भारती फुलमली (२३) व हरलीन देओल (२१) वगळता एकही भारतीय फलंदाज २० पेक्षा अधिक धावसंख्या करू शकली नाही. कर्णधार स्मृती मानधना १९ धावांवर बाद झाली. इंग्लंडकडून अ‍ॅना श्रबसोल हिने सर्वाधिक चार, तर जॉर्जिया एल्विसने दोन बळी मिळवले.

प्रत्युत्तरादाखल कोमलच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. अवघ्या ११ धावांत चार फलंदाजांना माघारी धाडत कोमल व एकता बिश्तने भारताला सुरेख सुरुवात करून दिली. मात्र हिदर नाइट (नाबाद ६४) व डॅनिएल व्हॅट (२२) यांनी महत्त्वपूर्ण खेळी साकारत संघाला विजयासमीप नेले. एकीकडून सर्व फलंदाज बाद होत असताना नाइट अखेपर्यंत टिकून राहिली. आठ फलंदाज बाद झाल्यावर १०व्या क्रमांकावरील लॉरेन विनफिल्डसह (नाबाद २३) तिने ३९ धावांची भागीदारी रचत ३८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

भारत : ४९ षटकांत सर्व बाद १५४ (भारती फुलमली २३, हरलीन देओल २१; अ‍ॅना श्रबसोल ४/३०) पराभूत वि.

इंग्लंड : ३७.३ षटकांत ८ बाद १५७ (हिदर नाइट नाबाद ६४, डॅनिएल व्हॅट २२; कोमल झांझड १४/३).