अखेरच्या षटकात इंग्लंडला नऊ धावांची गरज होती, त्यावेळी हा सामना इंग्लंड सहज जिंकेल असे म्हटले जात होते. पण अखेरच्या चेंडूवर जेव्हा तीन धावांची गरज हवी होती, तेव्हा मात्र हा सामना कोणीही जिंकू शकतो, या चर्चाना ऊत आला. पण इंग्लिश कर्णधार ईऑन मॉर्गनने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत पुन्हा एकदा जावेद मियाँदादची आठवण करून दिली आणि इंग्लंडने थरारक सामना सहा विकेट्स राखून जिंकला. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने १७८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य इंग्लंडपुढे ठेवले होते, पण गचाळ क्षेत्ररक्षण आणि बोथट गोलंदाजीमुळे इंग्लंडला हे आव्हान पार करता आले. अ‍ॅलेक्स हेल्स, मायकेल लुम्ब आणि मॉर्गनच्या तडफदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या ट्वेन्टीे -२० सामन्यात विजय साकारला. अखेपर्यंत झुंजत संघाला विजय मिळवून देणाऱ्या मॉर्गनला यावेळी सामानावीराचा पुरस्कार देण्यात आला, तर युवराज सिंगला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भारताच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या लुम्ब आणि हेल्स यांनी ८० धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. युवराजने आपल्या पहिल्याच षटकात लम्बचा काटा काढत ही जोडी फोडली. लुम्बने ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. त्यानंतर युवराजने हेल्स (४२) आणि ल्यूक राइटला (५) बाद करत इंग्लंडला ‘बॅकफूट’वर ढकलले होते. पण गोलंदाजांच्या कुचकामी कामगिरीमुळे भारताला सामन्यावरील पकड गमवावी लागली. मॉर्गनने अप्रतिम फलंदाजी करत २६ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ४९ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. युवराजचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही, भारताला पहिले तिन्ही विकेट्स युवराजनेच मिळवून दिले.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीला पाचारण केले. घरच्याच मैदानात अजिंक्य रहाणे (३) ‘थर्ड मॅन’ला जो रूटच्या हातात झेल देऊन स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर विराट कोहलीने २० चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ३८ धावा फटकावत संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर अन्य फलंदाजांना याचा फायदा उठवता आला नाही आणि भारताची १५व्या षटकांत ५ बाद १०८ अशी अवस्था होती. यावेळी सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघाला सावरले. धोनीने बाद होण्यापूर्वी १८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन खणखणीत षटकारांच्या जोरावर ३८ धावा कुटून काढल्या, तर रैनासह सहाव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली ती अवघ्या २७ चेंडूंमध्ये. धोनी बाद झाल्यावर भारताच्या फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाही आणि भारताला २० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात १७७ धावा करता आल्या. सुरेश रैनाने यावेळी २४ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३५ धावा काढल्या.    
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद १७७ (विराट कोहली ३८, महेंद्रसिंग धोनी ३८, सुरेश रैना नाबाद ३५; जेड डर्नबॅच २/३७, ल्युक राइट २/३८) पराभूत वि. इंग्लंड : २० षटकांत ४ बाद १८१ (मायकेल लुम्ब ५०, इऑन मॉर्गन नाबाद ४९, अ‍ॅलेक्स हेल्स ४२; युवराज सिंग ३/१७, अशोक दिंडा १/४४).
सामनावीर : इऑन मॉर्गन,
मालिकावीर : युवराज सिंग.