चौथ्या कसोटीत इंग्लंडवर एक डाव आणि २५ धावांनी विजय; मालिकेवर ३-१ असे प्रभुत्व; अश्विन-अक्षरचे प्रत्येकी पाच बळी

भारत-इंग्लंड चौथी कसोटी

फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी संभ्रमावस्थेतील इंग्लंडच्या फलंदाजीच्या फळीला पुन्हा धक्के दिले. या बळावर भारताने शनिवारी चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव करून लॉर्ड्सवर होणाऱ्या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामधील स्थान पक्के केले.

जूनमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी केन विल्यम्सनच्या न्यूझीलंडविरुद्ध लढण्यासाठी भारताला चौथा कसोटी सामना किमान अनिर्णीत राखण्याची आवश्यकता होती. परंतु अक्षर (२४-६-४८-५) आणि अश्विन (२२.५-४-४७-५) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव ५४.५ षटकांत १३५ धावांत गुंडाळला. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकत भारताने अ‍ॅन्थनी डी’मेलो करंडक पटकावला.

‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दर्जेदार संघ म्हणून इंग्लंडची गणना केली जाते. त्यामुळे इंग्लंडला मायदेशात नामोहरम करण्यासाठीही आम्हाला अतिशय मेहनत घ्यावी लागली. विजयाच्या इष्र्येने या मालिकेत भारताचा सांघिक खेळ उंचावत राहिला, हेच मला महत्त्वाचे वाटते, ’’ असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

अहमदाबादची तिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्यानंतर चौथी कसोटी अडीच दिवसांत निकाली ठरली. इंग्लंडकडे  शरणागतीशिवाय पर्याय नसल्याचे माजी कर्णधार मायकेल वॉनसह अनेक नामांकितांनी म्हटले होते. भारताने पहिल्या डावात ३६५ धावा उभारत पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. त्या तुलनेत इंग्लंडने दोन्ही डावांत मिळून ३४० धावा केल्या. फिरकी गोलंदाजीला खेळण्याचा न्यूनगंड इंग्लंडला मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांत भोवला.

अखेरच्या सामन्यासाठी चेंडू फार वळणारी खेळपट्टी नव्हती, परंतु इंग्लंडच्या फलंदाजांनी दडपणाखाली खेळून आपले बळी गमावले. नवख्या अक्षरच्या खात्यावर २७ बळी जमा झाले, तर अनुभवी अश्विनने ३२ बळी मिळवत मालिकावीर पुरस्कार पटकावला.

चौथ्या कसोटी कसोटी सामन्याच्या विजयाचे श्रेय ऋषभ पंतच्या झुंजार शतकी खेळीला जाते, तर वॉशिंग्टन सुंदरने १७४ चेंडूंत नाबाद ९६ धावांची खेळी साकारत भारतीय धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. वॉशिंग्टन आणि अक्षर (४३) यांनी आठव्या गडय़ासाठी १०६ धावांची बहुमोल भागीदारी उभारली. त्यामुळे भारताची ३६५ ही धावसंख्यासुद्धा इंग्लंडला ६५० इतकी अवघड वाटू लागली. अक्षर दुर्दैवाने धावचीत झाल्यानंतर स्टोक्सच्या पुढच्याच षटकात इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाल्यामुळे भारताचा डाव संपुष्टात आला. त्यामुळे समोरील बाजूच्या वॉशिंग्टनला शतकाने हुलकावणी दिली.

शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मालिकेतील अन्य सामन्यांप्रमाणेच गोलंदाजांचे वर्चस्व सिद्ध झाले. उपाहारानंतर इंग्लंडचा सलामीवीर झ्ॉक क्रॉवली (५), डॉम सिब्ली (३)आणि जॉनी बेअरस्टो (०) झटपट बाद झाल्यामुळे इंग्लंडची ३ बाद २० अशी त्रेधातिरपिट उडाली. भरवशाच्या जो रूटने ३० धावा काढल्या, तर बेन स्टोक्सने (२) निराशा केली. त्यानंतर इंग्लंडची ५ बाद ६५ अशी अवस्था झाली. डॉन लॉरेन्सने ५० धावांची खेळी करीत बेन फोक्सच्या (१३) साथीने सहाव्या गडय़ासाठी ४४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताचा विजय लांबला. पण चहापानानंतर अक्षर-अश्विनने भारताच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले

पंतची शतकी खेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी – शास्त्री

अहमदाबाद : चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने साकारलेल्या शतकामुळे सामन्याचा निकाल पालटला. भारतीय भूमीवर सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने प्रतिहल्ल्याच्या वृत्तीने साकारलेली ही सर्वोत्तम खेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली, अशा शब्दांत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऋषभचे कौतुक केले. सावधता आणि आक्रमकता यांचे मिश्रण असलेल्या पंतच्या ११८ चेंडूंत १०१ धावांच्या खेळीमुळे भारताने चौथा कसोटी सामना जिंकला. पंतच्या कामगिरीविषयी शास्त्री म्हणाले, ‘‘गेले तीन-चार महिने तो जिद्दीने खेळतो आहे आणि त्याचे निकाल आपल्याला दिसत आहेत. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर त्याने सक्षमपणे फलंदाजी केली. त्याच्यातील गुणवत्तीची आम्हाला खात्री होती. सामना जिंकून देण्याची क्षमता त्याच्यात आहे.’’

५ एका कसोटी मालिकेत ३०हून अधिक बळी आणि शतक साकारणारा अश्विन हा पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे.

१० कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात सलग १० वी कसोटी मालिका जिंकली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी साधली .

३० अश्विनने ३०व्यांदा डावात पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. या पंक्तीत सहाव्या स्थानावर असलेल्या जेम्स अँडरसनची त्याने बरोबरी साधली आहे.

१२ जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठताना भारताने सर्वाधिक १२*व्या विजयाची नोंद केली आहे.

४०९ अश्विनने कर्टली अ‍ॅम्बोजचा ४०५ बळींचा विक्रम मागे टाकला.

३६ इंग्लंडविरुद्धच्या विजयासह कोहलीने क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखालील ३६ कसोटी विजयांच्या विक्रमाची बरोबरी साधली.

८ अश्विनने आपल्या १० वर्षांच्या कारकीर्दीतील आठव्यांदा मालिकावीर पुरस्कार पटकावला.

भारत अग्रस्थानी

इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय मिळवल्यामुळे ‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत भारताला अग्रस्थान मिळाले आहे.

क्र. देश   गुण  मालिका   टक्के विजय   पराभव   अनिर्णीत

१.  भारत   ५२० ६  ७२.२%  १२ ४  १

२.  न्यूझीलंड   ४२० ५  ७०%   ७  ४  ०

३.  ऑस्ट्रेलिया  ३३२ ४  ६९.२%  ८  ४  २

४.  इंग्लंड  ४४२ ६  ६१.४%  ११ ७  ३

संक्षिप्त धावफलक

*  इंग्लंड (पहिला डाव) : २०५

*  भारत (पहिला डाव) : ९४ षटकांत ७ बाद २९४  (ऋषभ पंत १०१, वॉशिंग्टन सुंदर नाबाद ९६; जेम्स अँडरसन ३/४४)

*  इंग्लंड (दुसरा डाव) : ५४.५ षटकांत सर्व बाद १३५ (डॅन लॉरेन्स ५०, जो रूट ३०; अक्षर पटेल ५/४७, रविचंद्रन अश्विन ५/४८)

*  सामनावीर : ऋषभ पंत.

*  मालिकावीर : रविचंद्रन अश्विन.

भारताच्या दुसऱ्या फळीमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत संक्रमणाचा काळ येईल, तेव्हाही भारतीय संघाची वाटचाल सुखद असेल. पहिल्याच सामन्यात इंग्लंडने आम्हाला नामोहरम केले. त्यानंतर चेन्नईतील विजयाने आम्हाला मालिकेत पुनरागमन करता आले. रोहितची खेळी महत्त्वाची ठरली, तर अश्विनने आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. आता जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याचे स्वप्न सत्यात अवतरले आहे.

– विराट कोहली, भारताचा कर्णधार

भारताविरुद्धच्या मालिकेतील पराभव हा निराशाजनक आहे. सामन्याचा निकाल पालण्याची संधी आम्हाला अनेकदा चालून आली, परंतु आम्ही अपयशी ठरलो. मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांत भारताने हे महत्त्वाचे क्षण आमच्यापेक्षा अधिक उत्तम पद्धतीने हाताळले.

-जो रूट, इंग्लंडचा कर्णधार