प्रशांत केणी

भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका

सूर्यकुमार यादवला संधी न मिळाल्यामुळे गहुंजेत ‘सूर्य’ तळपण्याची आशा फोल ठरली. परंतु शुक्रवारी धावांचा मुसळधार पाऊस क्रिकेटरसिकांना अनुभवता आला. या पावसात भारताची होरपळ झाली. इंग्लंडने दुसरा सामना सहा गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

के. एल. राहुलच्या (१०८) शानदार शतकी खेळीला कर्णधार विराट कोहलीच्या संयमी आणि ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकांची साथ लाभल्यामुळे भारताने ६ बाद ३३६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण जॉनी बेअरस्टोच्या शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने चार फलंदाजांच्या मोबदल्यात ३९ चेंडू राखून दिमाखदार विजय साजरा केला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर सलामीवीर शिखर धवन (४) आणि रोहित शर्मा (२५) लवकर बाद झाल्यामुळे भारताची २ बाद ३७ अशी अवस्था झाली. परंतु राहुलने एकदिवसीय कारकीर्दीतील पाचवे शतक साकारताना सात चौकार आणि दोन षटकारांसह ११४ चेंडूंत १०८ धावा केल्या. कोहलीने तीन चौकार आणि एक षटकारासह ७९ चेंडूंत ६६ धावा केल्या. कोहली आणि राहुल जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १२१ धावांची बहुमोल भागीदारी केली. आदिल रशीदने कोहलीचा अडसर दूर केल्यानंतर राहुलने पंतच्या साथीने चौथ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या डावखुऱ्या पंतने दडपण झुगारत इंग्लंडच्या गोलंदाजांवर त्वेषाने हल्ला चढवला. त्याने बेन स्टोक्सच्या ४१व्या षटकात दोन सलग षटकारांची अदाकारी पेश करताना फक्त २८ चेंडूंत कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने सात षटकार आणि तीन चौकारांसह ४० चेंडूंत ७७ धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर पंतच्या साथीला आलेल्या हार्दिक पंड्यानेही पंतचा आक्रमणाचा कित्ता गिरवला. हार्दिकने १६ चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह ३५ धावा केल्या. पंत-हार्दिक जोडीच्या फटके बाजीमुळे भारताला अखेरच्या १० षटकांत १२६ धावा करता आल्या.

त्यानंतर, इंग्लंडच्या डावात रॉय आणि बेअरस्टो यांनी ११० धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. रोहित शर्माच्या चपळाईने रॉय धावचीत झाल्यावर बेअरस्टोच्या साथीला स्टोक्स येताच धावांचा वेग वाढला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ११७ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी करीत विजय आवाक्यात आणला. स्टोक्सने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करीत त्यांची लय बिघडवली. मागील सामन्यात ९४ धावांवर बाद झाल्यामुळे शतक हुकलेल्या बेअरस्टोने (११२ चेंडूंत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १२४ धावा) दुसऱ्या सामन्यात मात्र कारकीर्दीतील ११वे शतक साकारले. परंतु स्टोक्सला (५२ चेंडूंत ४ चौकार आणि १० षटकारांसह ९९ धावा) शतकाने हुलकावणी दिली. भुवनेश्वरने स्टोक्सला बाद करीत ही जोडी फोडली. पाठोपाठ बेअरस्टो आणि कर्णधार जोस बटलर (०) बाद झाल्यामुळे इंग्लंडची ४ बाद २८७ अशी स्थिती झाली. पण तोवर उशीर झाला होता. डेव्हिड मलान (१६*) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (२७*) यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून कुलदीप यादव (१० षटकांत ८४ धावा) आणि कृणाल पंड्या (६ षटकांत ७२ धावा) महागडे ठरले.

९ इंग्लंडच्या आदिल रशीदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा कोहलीला बाद करण्याची किमया साधली.

२ भारताने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा तीनशेहून अधिक धावसंख्या उभारली. याआधी २०१७मध्ये ही किमया साधली होती.

५ लोकेश राहुल याने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पाचवे शतक साकारले.

११ बेअरस्टो याने एकदिवसीय कारकीर्दीतील ११वे शतक शुक्रवारी झळकावले.

१०००० विराट तिसऱ्या क्रमांकावर (एकाच) फलंदाजी करून १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग यांच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला.

लाळेचा वापर करणाऱ्या स्टोक्सला तंबी

अनवधानाने लाळेचा वापर केल्याप्रकरणी इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मैदानावरील पंचांनी तंबी दिली. सामन्याच्या चौथ्या षटकात स्टोक्सने चेंडूला लाळ वापरली. या प्रकरणी पंच नितीन मेनन आणि वीरेंद्र शर्मा यांनी कर्णधार जोस बटलरला तंबी दिली. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) लाळेच्या वापरास बंदी घातली आहे.

संक्षिप्त धावफलक ’ भारत : ५० षटकांत ६ बाद ३३६ (के. एल. राहुल १०८, ऋषभ पंत ७७, विराट कोहली ६६, हार्दिक पंड्या ३५; रीसी टॉप्ली २/३५, टॉम करन २/८३) पराभूत वि. ’ इंग्लंड : ४३.३ षटकांत ४ बाद ३३७ (जॉनी बेअरस्टो १२४, बेन स्टोक्स ९९, जेसन रॉय ५५; प्रसिध कृष्णा २/५८)   ’ सामनावीर : जॉनी बेअरस्टो.