सप्टेंबर महिन्यात मायदेशात होणारी भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंडविरुद्धची सहा मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात न्यूझीलंड अ संघाचा भारत दौराही करोनामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय क्रिके ट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यांसदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी ती लवकरच होण्याची अपेक्षा आहे. ‘‘इंग्लंडचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबरच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, इंग्लंडचा संघ भारतात येण्याची शक्यता कमीच आहे,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची बैठक शुक्रवारी होणार असून भारतीय संघाच्या भविष्यातील मालिका आणि दौऱ्यांविषयी त्यात चर्चा केली जाणार आहे. ‘‘कार्यकारी समितीच्या बैठकीत दौरा निश्चितीबाबत चर्चा के ल्यानंतरच या दौऱ्यांविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येईल. न्यूझीलंड अ संघ ऑगस्ट महिन्यात भारतात येणार आहे, मात्र त्याविषयीही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही,’’ असेही त्यांनी सांगितले.

ब्रिटिश प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार, इंग्लंडचा हा मर्यादित षटकांच्या सामन्यांचा दौरा पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या नऊ लाखांच्या वर गेली असून २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना या संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाबाधितांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात भारतातील परिस्थिती सुधारली तरी इंग्लंड संघ भारतात येण्याची शक्यता कमीच आहे.

‘‘केंद्र सरकारने परवानगी दिली तर आम्ही ऑगस्ट महिन्यात सरावाला प्रारंभ करू, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अलीकडेच म्हटले होते. मात्र सद्य:स्थितीत सामन्यांचे आयोजन करणे अशक्य आहे,’’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. इंग्लंडचा दौरा सप्टेंबरच्या अखेरीस होणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिके ट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र करोनामुळे ही स्पर्धाही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, भारतात किं वा परदेशात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन करता येईल. भारताचा अखेरचा दौरा मायदेशात दक्षिण आफ्रिके विरुद्ध मार्चमध्ये झाला.

भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बिग बॅश लीगचे आयोजन

ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ट्वेन्टी-२० बिग बॅश लीगच्या (बीबीएल) १०व्या आवृत्तीचे संपूर्ण ६१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारताच्या या वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या नियोजित ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळेसच ‘बीबीएल’चे सामने होणार आहेत. ‘बीबीएल’मधील सामन्यांना ३ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे स्ट्रायकर्स विरुद्ध रेनेगेड्स यांच्यातील लढतीने सुरुवात होणार आहे. ३ डिसेंबरपासूनच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिली कसोटी ब्रिस्बेन येथे सुरू होण्याचे नियोजित आहे. ‘बीबीएल’ची अंतिम लढत पुढील वर्षी ६ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे. या लीगमध्ये ११ ते १५ डिसेंबरदरम्यान पाच दिवसांची विश्रांती घेण्यात येणार आहे. त्यावेळेस भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी अ‍ॅडलेड येथे होणार आहे.