विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यातील पराभवाची परतफेड गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, असा इशारा इंग्लंडचा फलंदाज जो रूटने दिला आहे.

लॉर्ड्सवर इंग्लंडला परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध निराशाजनक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यजमान इंग्लंडला विश्वचषकाच्या साखळीतच गाशा गुंडाळावा लागणार होता. परंतु भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध मिळवलेल्या विजयांमुळे इंग्लंडने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले. विश्वचषकातील दुसरी उपांत्य लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एजबॅस्टन येथे होणार आहे.

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मागील ११ सामन्यांपैकी नऊ सामने आम्ही जिंकले आहेत. त्यामळे ऑस्ट्रेलिया संघाचा आम्हाला गेली चार वष्रे सकारात्मक अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला नक्कीच यश मिळेल. इंग्लंडच्या खेळाचा आलेख पाहिल्यास कोणाचे वर्चस्व अधिक काळ राहिले हे स्पष्ट होते,’’ असे रूटने सांगितले.