सर्वोत्तम कसोटीपटू, सर्वोत्तम मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू आणि प्रेक्षकपसंती अशा तीन मानाच्या पुरस्कारांवर जो रूटने मोहर उमटवली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचा वार्षिक क्रिकेट पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पार पडला.

यॉर्कशायरचा २५ वर्षीय फलंदाज रूटने गतवर्षी मिळवलेल्या अ‍ॅशेस विजयांत दोन शतके झळकावली होती. याचप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके झळकावली आहेत, तर नुकत्याच भारतात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा रूटनेच काढल्या होत्या.

वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार पटकावताना रूटने स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स यांना मागे टाकले. मर्यादित षटकांमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी जोस बटलर आणि डेव्हिड विली यांना रूटने मागे टाकले.

सॉमरसेटच्या अन्या श्रुबसोले हिला वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले. नुकतीच निवृत्ती स्वीकारणारी इंग्लंडची अनुभवी कर्णधार चार्लोट एडवर्डसला प्रेक्षकपसंतीचा पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडचे माजी प्रशिक्षक आणि सध्या स्काय स्पोर्ट्समध्ये समालोचन करणाऱ्या डेव्हिड लॉइड यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.