आयपीएलच्या पैशातून स्टोक्सने घेतली ‘सुपरकार’, पुण्यानं त्याच्यासाठी सर्वाधिक रक्कम मोजली होती
इंग्लंडच्या संघातील अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पुण्याच्या संघातून खेळताना दिसला होता. रायझिंग पुणे सुपर जाएंट्सने त्याच्यासाठी तब्बल १४ कोटींची रक्कम मोजली होती. या रकमेमुळे आयपीएल स्पर्धेतील स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. साखळी सामन्यानंतर मायदेशी परतलेल्या स्टोक्सने आयपीएलमध्ये मिळालेल्या मानधनाच्या रकमेतून महागडी कार खरेदी केली आहे. ‘दैनिक मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलमधून मिळालेल्या रकमेतील तब्बल १७ लाख डॉलर इतकी रक्कम त्याने सुपरकार खरेदी करण्यासाठी खर्च केले.

महागडी कार खरेदी केल्याच्या वृत्ताला खुद्द स्टोक्सने दुजोरा दिला आहे. तो म्हणाला की, आयपीएलमध्ये मिळालेल्या बाकी रकमेला मी तूर्त खर्च करणार नाही. मला कार खूप आवडतात. स्वत:ला आनंदित करण्यासाठी मला आयपीएलमध्ये मिळालेल्या रकमेतून समाधान मिळवायचे होते. त्यामुळे मी कार खरेदी करण्यास प्राधान्य दिले. आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून बेन स्टोक्स अनेकदा चर्चेत आला आहे. यावर तो म्हणाला की, पैसा किती मिळाला यापेक्षा मैदानावर खेळ कसा झाला हे माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. आयपीएलमध्ये मी नैसर्गिक खेळी करण्यात यशस्वी ठरलो, त्यामुळे मी ताठमानेने मायदेशी परतू शकलो, असे त्याने सांगितले.

आयपीएलच्या दहाव्या सत्रात पुण्याच्या संघातील साखळी सामन्यापर्यंतच तो पुण्याकडून खेळू शकला. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेसाठी त्याला आयपीएल अर्ध्यातून सोडावे लागले होते. त्याची उणीव पुणे संघाला आयपीएल स्पर्धेत जाणवली होती. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सने तुफानी खेळ केला होता. या सामन्यात त्याने १०३ धावांची खेळी केली होती. तसेच पाच बळी देखील मिळवले होते. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पुण्याचा अंतिम अंतिम सामन्याच्या दिशेने जाण्याचा मार्ग सुकर झाला होता. आयपीएलमध्ये स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळल्यानंतर सध्या बेन स्टोक्स स्मिथविरुद्ध मैदानात उतरताना दिसत आहे.