लाचलुचपत प्रतिबंधनात्मक नियम अधिक कडक करताना इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) आगामी क्रिकेट हंगामासाठी खेळाडूंना स्मार्टवॉच घालण्यास प्रतिबंध केला आहे.

‘‘इंग्लंडमधील क्रिकेटपटूंना आधी स्वार्टवॉच वापरण्याची मुभा होती. परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट प्रक्षेपण होणाऱ्या सामन्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खेळाडूंवरील बंधने अधिक कडक करण्याच्या दृष्टिकोनातून स्मार्टवॉचला बंदी घालण्यात आली आहे. परंतु प्रक्षेपण होत नसलेल्या सामन्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे,’’ असे इंग्लंड क्रिकेट मंडळाने सांगितले.

२०१९ची कौंटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा चालू असताना स्टीव्हन क्रॉफ्टने लँकशायरचा फिरकीपटू मॅट पार्किन्सनला इंग्लंडकडून पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे स्मार्टवॉचच्या साहाय्याने सूचित केले होते. त्यावेळी माहितीच्या देवाणघेवाणीचा हा स्रोत उजेडात आला.