रशफोर्ड व फेलाईनी यांचे गोल; लिस्टर सिटीवर मात

इंग्लिश प्रीमिअर फुटबॉल लीग

मँचेस्टर युनायटेड क्लबने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामातील शंभर टक्के विजयाचे सूत्र कायम राखताना लिस्टर सिटी क्लबवर २-० अशी मात केली. बदली खेळाडू मार्कस रशफोर्ड आणि मॅरोयूने फेलाईनी यांनी प्रत्येकी एक गोल करून युनायटेडला विजयी हॅट्ट्रिक करण्यात यश मिळवून दिले. विशेष म्हणजे या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी ओल्ड ट्रॅफर्ड येथील स्टेडियमवर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या दिग्गज धावपटू उसेन बोल्टने सर्वाचे लक्ष वेधले. फुटबॉलचा आणि त्यात मँचेस्टर युनायटेड क्लबचा चाहता असलेल्या बोल्टला सामन्यानंतर विजयी खेळाडूंची भेटही घेतली.

रोमेलू लुकाकू या एकमेव आघाडीपटूसह मैदानात उतरलेल्या युनायटेडसाठी पहिले सत्र क्लेशदायक ठरले. सातत्याने प्रयत्न करूनही लिस्टर सिटीचा गोलरक्षक कॅस्पर शीमिचेलची बचावभिंत ओलांडण्यात त्यांना अपयश आले. लिस्टरची बचावफळीही चोख कामगिरी बचावताना युनायटेडचे आक्रमण थोपवत होती. ज्युआन माटाने केलेला गोलही सामनाधिकाऱ्यांनी ऑफ साइड देत अपात्र ठरवल्याने युनायटेडची चिडचिड वाढली. पेनल्टी स्पॉट किकवरील लुकाकूचा प्रयत्नही शीमिचेलने इतक्या सफाईने अडवून त्याने युनायटेडच्या तोंडचा घास पळवला.

दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी रशफोर्ड आणि फेलाईनी यांना पाचारण केले आणि ७०व्या मिनिटाला युनायटेडने गोलखाते उघडले. हेन्रिख मॅखिटारियनच्या पासवर रशफोर्डने हा गोल केला. त्यानंतर युनायटेडने सातत्याने आक्रमण करणे सुरूच ठेवले. पण लिस्टरच्या बचावपटूंकडून त्यांना तितकीच कडवी टक्कर मिळत होती. पहिल्या दोन लढतीत ४-० असा मोठा विजय मिळवणाऱ्या युनायटेडला १-० अशा आघाडीवरच समाधान मानावे लागेल असे वाटत होते. मात्र ८२व्या मिनिटाला फेलाईनीच्या मांडीला चेंडू लागून गोलजाळीत सहज झेपावला आणि युनायटेडने २-० असा विजय निश्चित केला.

१५

मँचेस्टर युनायटेडने लिस्टर सिटीविरुद्धच्या २३ पैकी १५ सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर केवळ दोन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला असून सहा लढती अनिर्णीत राहिल्या.

१४

मँचेस्टर युनायटेड १४ रात्र ईपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. याआधी त्यांनी २०१५-१६ आणि २०१६-१७च्या हंगामातही १४ रात्र अव्वल स्थान अबाधित राखले होते.

०५

ईपीएलच्या पहिल्या तीन लढतींत सर्वाधिक पाच गोल करण्यात साहाय्य करण्याचा वेगळा विक्रम युनायटेडच्या  हेन्रिख मॅखिटारियन याने नावावर केला. याआधी १९९४-९५च्या हंगामात न्यूकॅसल युनायटेडकडून खेळणाऱ्या रुएल फॉक्स यांनी हा विक्रम केला होता.

०३

लिस्टर सिटीचा गोलरक्षक कॅस्पर शीमिचेलने ५ पैकी ३ पेनल्टी स्पॉट किक अडवल्या आहेत.