इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलच्या तीन क्लबमधील चौघांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

इंग्लिश प्रीमियर लीगच्या १००८ खेळाडू आणि मार्गदर्शकांची सोमवारी आणि मंगळवारी करोना चाचणी करण्यात आली होती. करोनाची बाधा झालेल्या या चौघांना सात दिवसांसाठी अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत २७५२ जणांच्या चाचण्या झाल्या असून, यापैकी १२ जणांना करोनाची लागण झाली आहे.

सरकारच्या निर्णयाची सेरी ए लीगला प्रतीक्षा

रोम : इटालियन फुटबॉल हंगाम करोनाच्या साथीमुळे तीन महिने स्थगित आहे. आता सेरी ए फुटबॉल लीग पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारच्या हिरव्या कं दिलाची प्रतीक्षा आहे.

हंगेरीत फुटबॉल सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी

बुडापेस्ट : दी हंगेरीयन सॉकर महासंघाने फु टबॉल सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. तीन खुच्र्या रिकाम्या सोडून प्रत्येक चौथी खुर्ची प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. याचप्रमाणे कोणत्याही प्रेक्षकाच्या पुढील आणि मागील खुर्चीवर प्रेक्षकाला बसण्यास परवानगी नसेल, अशी ही रचना करण्यात आली आहे.

बेल्जियन चषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी १ ऑगस्टला

ब्रूसेल्स : करोनाच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आलेली बेल्जियन चषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत १ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बेल्जियममधील पुढील फुटबॉल हंगामाला प्रारंभ होण्याच्या एक आठवडा आधी हा सामना होणार आहे. क्लब ब्रूगे आणि अँटवर्प या दोन संघांमध्ये रिकाम्या किंग बॉडॉइन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. बेल्जियममधील सर्व क्रीडा स्पर्धा ३१ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.