दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर युनायटेडला मंगळवारी लिस्टर सिटीकडून १-२ अशा पराभवाला सामोरे जावे लागल्याने मँचेस्टर सिटीच्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. मँचेस्टर सिटीचे हे गेल्या चार वर्षांतील तिसरे जेतपद ठरले.

मँचेस्टर सिटीने आता तीन सामने शिल्लक राखून १० गुणांची निर्णायक आघाडी घेतली आहे. मँचेस्टर युनायटेडचे वर्चस्व मोडीत काढत सिटीने आता गेल्या १० मोसमात पाच जेतेपदांची कमाई केली आहे. मँचेस्टर युनायटेडचा पराभव झाल्यानंतर सिटीच्या चाहत्यांनी विजयाचा जल्लोष केला. आता २३ मे रोजी एव्हर्टनविरुद्ध होणाऱ्या मोसमातील अखेरच्या सामन्यानंतर मँचेस्टर सिटीला जेतेपदाचा चषक उंचावताना पाहण्याची संधी १० हजार चाहत्यांना मिळेल. सिटीने या मोसमात चौथ्यांदा लीग चषकाचे जेतेपद मिळवले. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदाची संधीही त्यांना मिळणार आहे.

चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी पोर्टोत

वेम्बले स्टेडियमवर प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी आयोजित करण्याबाबतची ब्रिटन सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर आता ही लढत पोर्तुगालमधील पोर्टोत खेळवण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चिात झाले आहे. ही लढत नियोजित वेळापत्रकानुसार टर्कीमधील इस्तंबूल येथे होणार होती. आता २९ मे रोजी होणाऱ्या या लढतीसाठी पोर्टोमधील ५० हजार प्रेक्षकक्षमतेचे इस्टॅडियो डो ड्रॅगाओ स्टेडियम सज्ज झाले आहे.