१० जणांसह खेळणाऱ्या चेल्सीला शनिवारी इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये तळाच्या क्रमांकावरील वेस्टब्रूमविच अल्बियान संघाकडून २-५ अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अव्वल चार जणांमध्ये स्थान कायम राखण्याच्या चेल्सीच्या आशा धूसर झाल्या आहेत.

चेल्सी संघ गेल्या १४ सामन्यांमध्ये अपराजित राहिला होता. पण बचावात केलेल्या चुकांची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. ख्रिस्तियन पुलिसिक याने २७व्या मिनिटाला चेल्सीचे खाते खोलत शानदार सुरुवात करून दिली. पण पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत मॅथेअस परेरा याने दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत वेस्टब्रूमला सामन्यात पुनरागमन करून दिले.

कॅलम रॉबिन्सन (६३व्या मिनिटाला) आणि एमबाये डाएग्ने (६८व्या मिनिटाला) यांनी दुसऱ्या सत्रात प्रत्येकी एक गोल करत वेस्टब्रूमविचची आघाडी ४-१ अशी वाढवली. चेल्सीच्या मसोन माऊंट याने संघासाठी दुसरा गोल झळकावत पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण रॉबिन्सनने ९०व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची भर घालत वेस्टब्रूमविच अल्बियानला दणदणीत विजय मिळवून दिला. चेल्सी ५१ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर वेस्टब्रूमविच २१ गुणांसह १९व्या क्रमांकावर आहे.

एसी मिलानची बरोबरी

मिलान : एसी मिलानला शनिवारी सॅम्पडोरियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जेतेपद पटकावण्याच्या एसी मिलानच्या स्वप्नांना सुरूंग लागला आहे. फॅबियो काग्लिआरेला याने ५७व्या मिनिटाला सॅम्पडोरियासाठी पहिला गोल केला. सामना संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना एसी मिलानच्या जेन्स हेग याने गोल करत हा सामना बरोबरीत सोडवला.