27 November 2020

News Flash

टॉटनहॅमच्या विजयात गॅरेथ बॅलेची चमक

गॅरेथ बॅले याने मिळालेल्या संधीचे सोने करत टॉटनहॅम हॉटस्परसाठी दुसरा गोल नोंदवला

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

गॅरेथ बॅले याने मिळालेल्या संधीचे सोने करत टॉटनहॅम हॉटस्परसाठी दुसरा गोल नोंदवला. त्यामुळे टॉटनहॅमने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये ब्रायटनचा २-१ असा पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.

२०१३मध्ये विक्रमी रकमेला रेयाल माद्रिदने बॅलेला करारबद्ध केल्यानंतर तो यंदाच्या मोसमापासून दुसऱ्यांदा टॉटनहॅमचे प्रतिनिधित्व करत आहे. दुसऱ्या सत्रात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने ७७व्या मिनिटाला हेडरद्वारे अप्रतिम गोल करत टॉटनहॅमच्या विजयावर मोहोर उमटवली. त्याआधी, हॅरी केनने १३व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे टॉटनहॅमला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर तारिक लेम्पटे याने ५६व्या मिनिटाला ब्रायटनला बरोबरी मिळवून दिली होती. टॉटनहॅमचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी बॅलेचे कौतुक केले आहे.

तत्पूर्वी, कॅलम विल्सन याने केलेल्या दोन गोलमुळे न्यूकॅसलने एव्हर्टनचा २-१ असा पाडाव केला. या पराभवामुळे अग्रस्थान राखण्याची एव्हर्टनची संधी हुकली असून त्यांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्सेनलने मँचेस्टर युनायटेडचे आव्हान २-१ असे परतवून लावले. पाएरे-एमेरिक ऑबामेयांग याने ६९व्या मिनिटाला केलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला.

रेयाल सोसिएदाद अग्रस्थानी

ला-लीगा फुटबॉल

* डेव्हिड सिल्वाने हेडरद्वारे खाते खोलल्यानंतर रेयाल सोसिएदादने सेल्टा व्हिगो संघाचा ४-१ असा पराभव करत ला-लीगा फुटबॉलच्या गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. मिकेल ओयारझबाल याने दुसरा गोल लगावल्यानंतर विलियन जोस याने ५४व्या आणि ८१व्या मिनिटाला गोल करत सोसिएदादच्या विजयावर मोहोर उमटवली. यामुळे सोसिएदादने रेयाल माद्रिदला एका गुणाने मागे टाकत १७ गुणांनिशी अग्रस्थान काबीज केले आहे.

लिलेची अपराजित राहण्याची मालिका कायम

फ्रेंच-१ लीग फुटबॉल

लिलेने फ्रेंच लीग-१ फुटबॉलमध्ये अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली आहे. लिले आणि लिऑन संघातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली असली तरी गुणतालिकेत लिलेला पॅरिस सेंट जर्मेनने दोन गुणांनी मागे टाकत अग्रस्थान मिळवले आहे. मोनॅकोने बोर्डेऑक्स संघाचा ४-० असा धुव्वा उडवला असला तरी ते आठव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:20 am

Web Title: english premier league football second place with tottenham victory abn 97
Next Stories
1 भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीकडे लक्ष!
2 टीम इंडियाला मिळाला नवीन ‘किट स्पॉन्सर’, प्रत्येक सामन्यासाठी मोजणार ६५ लाख
3 पी. व्ही. सिंधू म्हणाली; “मी निवृत्त होतेय पण…”
Just Now!
X