मँचेस्टर : चेल्सीने पिछाडीवरून मुसंडी मारत इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये बलाढय़ मँचेस्टर सिटीचा २-१ असा पराभव केला. त्यामुळे मँचेस्टर सिटीला जेतेपदासाठी आणखी एक सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मँचेस्टर सिटीच्या चाहत्यांनी पहिल्या सत्रानंतरच ‘चॅम्पियन्स’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. रहिम स्टर्लिगने ४४व्या मिनिटाला गोल करत मँचेस्टर सिटीला आघाडीवर आणले होते. पण हकिम झियेच (६३व्या मिनिटाला) आणि मार्कोस अलोन्सो (९०+२व्या मिनिटाला) यांनी गोल करत चेल्सीला विजय मिळवून दिला. आता मँचेस्टर सिटी ३५ सामन्यांत ८० गुणांसह आघाडीवर असला तरी मँचेस्टर युनायटेडने ३५ सामन्यांत ७३ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. आता तीन लढती शिल्लक असल्यामुळे सात गुणांची आघाडी असलेल्या सिटीला जेतेपदासाठी पुढील सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

अ‍ॅटलेटिको माद्रिदची बार्सिलोनाशी बरोबरी

अ‍ॅटलेटिको माद्रिदने बार्सिलोनाला गोलशून्य बरोबरीत रोखत ला-लीगा फुटबॉलमध्ये दोन गुणांची आघाडी कायम राखली आहे. अ‍ॅटलेटिको माद्रिद ३५ सामन्यांत ७७ गुणांसह अग्रस्थानी असून बार्सिलोनाने तेवढय़ाच लढतींमध्ये ७५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. रेयाल माद्रिदला मात्र अ‍ॅटलेटिकोला गाठण्याची संधी आहे. रविवारी रंगणाऱ्या सामन्यात रेयाल माद्रिदला सेव्हिया कशी झुंज देतो, यावरून जेतेपदाचा फैसला होऊ शकतो.

बार्सिलोना, रेयाल माद्रिद, युव्हेंटस संघांवर बंदी?

लंडन : सुपर लीग फुटबॉलशी करारबद्ध झालेल्या १२ पैकी नऊ क्लब्सनी युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) सुनावलेला आर्थिक भुर्दंड स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील बंदीची कारवाई टळली आहे. मात्र बार्सिलोना, रेयाल माद्रिद आणि युव्हेंट्स या संघांनी एकत्रीकरणाच्या उपाययोजना स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. आता हे प्रकरण ‘यूएफा’च्या शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र या तीन क्लब्सच्या सहभागावर बंदी येऊ शकते.