* अ‍ॅलिस्टर कुक ८७; केव्हिन पीटरसन ६२
‘चेंडू पहिल्या दिवसापासूनच वळायला पाहिजे’, ही भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीची अपेक्षा पूर्ण करण्यात आली खरी. पण वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर आपण रचलेल्या चक्रव्यूहात आपणच अडकू की काय, या भीतीचे सावट दुसऱ्या दिवसअखेरीस तीव्रतेने जाणवू लागले होते. ग्रॅमी स्वान आणि मॉन्टी पनेसार या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी भारताचे शेपूट फार वळवळू न देता ३२७ धावसंख्येवर पूर्णविराम दिला. त्यानंतर भारताच्या फिरकी त्रिकुटाचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन यांनी समर्थपणे सामना करीत २ बाद १७८ असे दमदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळावरील इंग्लिश संघाचे वर्चस्व पाहता भारतीय फिरकी गोलंदाजांना सामन्यावरील पकड निसटू न देण्यासाठी रविवारी अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु ‘इंग्लिश.. विंग्लिश, फिरकी.. गिरकी’ या साऱ्यांनिशी प्रकट झालेली ही दुसरी कसोटी निर्णायक आणि रंगतदार होणार हे मात्र स्पष्ट झाले आहे. २००६मध्ये इंग्लंडने वानखेडेची कसोटी जिंकून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. ती पुनरावृत्ती टाळण्याचा भारतीय संघाचा कसोशीचा प्रयत्न असेल.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडच्या भारत दौऱ्याला प्रारंभ झाल्यापासून कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने येथील खेळपट्टय़ा आणि फिरकी गोलंदाजी यांचे मर्म चांगलेच आत्मसात केले आहे. अहमदाबादच्या पहिल्या कसोटी झुंजार नाबाद १७६ धावांची खेळी उभारणारा कुक मुंबई कसोटीतही मैदानावर टिकून राहिला. निक कॉम्प्टनसोबत ६६ धावांची सलामी दिल्यानंतर भारताच्या प्रग्यान ओझाने इंग्लंडची २ बाद ६८ अशी अवस्था केली. पण हा आलेख भारताच्या फिरकी गोलंदाजांना फार उंचावता आला नाही. अहमदाबाद कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरणाऱ्या केव्हिन पीटरसनला अखेर वानखेडेवर सूर गवसला. भारतीय वातावरणात ख्ेाळण्याचा चांगला अनुभव गाठीशी असणाऱ्या पीटरसनने मग कुकला छान साथ दिली. कुक-पीटरसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ११० धावांची भागीदारी करून इंग्लंडला दुसऱ्या दिवसअखेर सुस्थितीत राखले. कुकने २०९ चेंडूंत १० चौकार आणि एक षटकारांसह नाबाद ८७ धावांची खेळी साकारली असून, पीटरसन ६२ धावांवर खेळत आहे. कुक आणि पीटरसन यांच्या लेग स्टंपच्या चेंडूवरील हल्ल्यांमुळे शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करणाऱ्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना मैदान सोडण्याची पाळी आली. सध्या इंग्लंडचा संघ भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून १४९ धावांच्या पिछाडीवर आहे. पण हे दोन झुंजार फलंदाज अधिक काळ टिकल्यास इंग्लंडला मोठी धावसंख्या रचणे फारसे कठीण जाणार नाही. त्यामुळे रविवारी सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना सर्वप्रथम ही जोडी फोडण्याचे महत्त्वाचे आव्हान असेल.
तत्पूर्वी पुजारा आणि आर. अश्विन ही शनिवारची नाबाद जोडी फोडण्यात पनेसारने सकाळच्या नवव्या षटकात यश मिळवले. त्यानंतर भारताचा डाव घसरला. भारताचे उर्वरित चार फलंदाज फक्त ४७ धावांत तंबूत परतले. उपाहाराला २० मिनिटे शिल्लक असताना भारताचा पहिला डाव ३२७ धावांत आटोपला. पनेसारने पाच आणि स्वानने चार असे नऊ फलंदाज हे इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी बाद केले.    

मोठी आघाडी मिळवण्याचे ध्येय -स्वान
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर आम्ही चांगल्या स्थितीत असलो तरी मजबूत स्थितीत नाही. या सामन्यात आम्हाला चांगली सुरुवात मिळाली आहे. त्याचबरोबर खेळपट्टीही फलंदाजीसाठी सोपी असल्याने मोठी आघाडी मिळवण्याचेच आमचे ध्येय असेल, असे शनिवारी दोनशे बळींचा टप्पा पार करणाऱ्या इंग्लंडच्या ग्रॅमी स्वानने सामन्यानंतर सांगितले. तो पुढे म्हणाला की, हरभजन सिंगला पायचीत करीत कारकिर्दीत मी दोनशे बळी मिळवले, त्याचा नक्कीच आनंद आहे. पण माझ्यासाठी चेतेश्वर पुजाराची विकेट फार मोलाची आहे. कारण पुजारा एक चांगला युवा फलंदाज आहे आणि चांगल्या फॉर्मात आहे. आमच्याविरुद्ध तो चांगल्या धावा करत होता. त्यामुळे त्याला बाद करणे संघासाठी महत्त्वाचे होते आणि ते माझ्याकडून घडल्याने मी आनंदित आहे.

धावफलक
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर पायचीत गो. अँडरसन ४, वीरेंद्र सेहवाग त्रिफळा गो. पनेसार ३०, चेतेश्वर पुजारा यष्टीचीत प्रायर गो. स्वान १३५, सचिन तेंडुलकर त्रिफळा गो. पनेसार ८, विराट कोहली झे. कॉम्प्टन गो. पनेसार १९, युवराज सिंग त्रिफळा गो स्वान ०, महेंद्रसिंग धोनी झे. स्वान गो. पनेसार २९, आर. अश्विन पायचीत गो. पनेसार ६८, हरभजन सिंग पायचीत गो. स्वान २१, झहीर खान झे. बेअरस्टो गो. स्वान ११, प्रग्यान ओझा नाबाद ०, अवांतर (लेग बाइज १, नोबॉल १) २, एकूण ११५.१ षटकांत सर्व बाद ३२७.
बाद क्रम : १-४, २-५२, ३-६०, ४-११८, ५-११९, ६-१६९, ७-२८०, ८-३१५, ९-३१६, १०-३२७.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १८-३-६१-१, स्टुअर्ट ब्रॉड १२-१-६०-०, पनेसार ४७-१२-१२९-५, ग्रॅमी स्वान ३४.१-७-७०-४, समित पटेल ४-१-६-०.
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक खेळत आहे ८७, निक कॉम्प्टन झे. सेहवाग गो. ओझा २९, जोनाथन ट्रॉट पायचीत गो. ओझा ०, केव्हिन पीटरसन खेळत आहे ६२, एकूण ६५ षटकांत २ बाद १७८
बाद क्रम : १-६६, २-६८
गोलंदाजी : आर. अश्विन २२-५-५४-०, प्रग्यान ओझा २१-३-६५-२, झहीर खान ८-४-१२-०, हरभजन सिंग १४-०-४७-०.