सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द झाल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलसह अन्य महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. भारतीय खेळाडू सध्या आपल्या परिवारासोबत घरात राहून सुट्टीचा आनंद घेत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकत्याच इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पिटरसनसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये विराटने फलंदाजीदरम्यान आपले सर्वोत्तम दोन साथीदार सांगितले.

केविन पिटरसनने विराटला तुला कोणत्या खेळाडूसोबत फलंदाजी करणं अधिक आवडतं असा प्रश्न विचारला. ज्याला उत्तर देताना विराट म्हणाला, “जो खेळताना माझ्या इशाऱ्यावर लक्ष ठेवेल अशा कोणत्याही खेळाडूसोबत मला फलंदाजी करायला आवडतं. त्यामुळे भारताकडून खेळत असताना धोनी आणि इतर वेळेस एबी डिव्हीलियर्स हे दोन खेळाडू माझे सर्वोत्तम साथीदार आहेत. डिव्हीलियर्ससोबत असताना आमची भागीदारी बनत जाते, आम्ही कधीकधी क्रिकेटबद्दल जराही बोलत नाही.”

यावेळी विराट कोहलीने आयपीएलमध्ये आपला RCB संघ आतापर्यंत एकही विजेतेपद का मिळवू शकला नाही याबद्दलही भाष्य केलं. “ज्यावेळी तुमच्या संघात नावाजलेले खेळाडू असतात त्यावेळी सर्वांचं लक्ष तुमच्या संघाकडे असतं. आम्ही आतापर्यंत ३ वेळा अंतिम फेरीत पोहचलो मात्र एकदाही विजयी होऊ शकलो नाही. पण या सगळ्या गोष्टींना काहीच महत्व नाही. संघात सर्वोत्तम खेळाडू असतानाही आम्हाला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. माझ्यामते एखाद्या गोष्टीसाठी आपण जेव्हा अधिक मेहनत घेतो तितकी ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते. माझ्या मते आम्हाला संघात खेळीमेळीचं आणि हसरं वातावरण आणणं गरजेचं आहे. प्रत्येक सामन्यात तुम्ही ठरवता तसंच होतं असं नाही.”