रविवारी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा ४-० अशी मातीमोल ठरवून रुबाबात बोर्डर-गावस्कर चषकाला गवसणी घातली. साऱ्या क्रिकेटजगतासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यांवर ०-४ अशा फरकानेच मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतीय भूमीवर इंग्लिश संघाने २-१ अशी मालिका जिंकण्याची करामत दाखवली होती. या सर्व परिस्थितीत कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचे पद ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत डावावर होते. परंतु क्रिकेटजगतामधील एका ऐतिहासिक अनुभूतीनिशी आता भारतीय क्रिकेटमध्ये सुखाचे दिवस आले आहेत.
२००८मध्ये फिरोझशाह कोटला याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच तिसऱ्या कसोटी सामन्याने भारतीय क्रिकेटमध्ये परिवर्तन घडले होते. दुखापत, फॉर्म आणि कर्णधारपद यांच्याशी झुंजणाऱ्या अनिल कुंबळेने याच मैदानावर निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर कुंबळेला स्वत:च्या खांद्यावर घेत धोनीने प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले होते. त्या वेळी सर्वानाच कळून चुकले होते, धोनी हाच भारताचा भावी नायक असेल. अपेक्षेप्रमाणेच ती मालिका भारताने जिंकली होती. त्या वेळी तिसऱ्या कसोटीत कुंबळे तर चौथ्या कसोटी सौरव गांगुली यांनी निवृत्ती पत्करली होती. या वेळी आपण प्रथमच ऑस्ट्रेलियाशी झुंजलो ते राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या अनुपस्थितीत. द्रविड आणि लक्ष्मण यांच्याशिवाय आपण प्रथमच ऑस्ट्रेलियाशी लढलो. इतकेच कशाला वेगवान गोलंदाज झहीर खान याचप्रमाणे वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही सलामीची जोडीसुद्धा आपल्यासमवेत नव्हती. ऑस्ट्रेलियाचा संघसुद्धा रिकी पाँटिंग, माइक हसी यांच्याशिवाय खेळत होता. त्यामुळे जशी भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची उणीव भासत होती, तशीच ऑस्ट्रेलिया संघातही वानवा होती. भारतीय संघात ऑफ-स्पिनर हरभजन सिंग होता, पण त्याची फिरकी अखेरच्या घटका मोजत असल्याचेच प्रत्ययास येत होते. सर्वात अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकरकडून फार धावा झाल्या नाहीत. परंतु त्याच्या कारकिर्दीचे उत्तरायण सुरू झाले आहे, हे त्याच्या कामगिरीवरून सहज लक्षात येते.
धोनीने या मालिकेसाठी सर्वात प्रथम गौतम गंभीरला दूर केले. त्यानंतर सेहवागला पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पुरेशी संधी देऊन मग बाजूला केले. मग मुरली विजय, शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या नव्या चेहऱ्यांवर भारताच्या सलामीची धुरा यशस्वीपणे सोपवली. शंभराव्या कसोटी सामन्यासाठी आतुरलेल्या भज्जीलाही त्याने दोन कसोटीत पुरेशी संधी दिली. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या तुलनेत तो कसा अयशस्वी ठरतोय, हे सिद्ध केले. आता यापुढे भारतीय संघात पुन्हा भज्जी दिसला नाही, तर आश्चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही. धोनीने केवळ नेतृत्वच नव्हे तर फलंदाजीतूनही आपल्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवत ठेवला. या विजययात्रेनंतर धोनीने अनपेक्षितपणे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना रोखठोक जाब विचारला. व्यूहरचना आणि बचावात्मक नेतृत्व यांच्यातील फरक काय, हाच प्रश्न त्याने सर्वाना विचारला. क्रिकेटमधील कठीण काळाने खूप शिकवले, हे जसे धोनीने स्पष्ट केले तसेच युवा खेळाडू संघात असल्याचा गांभीर्याने फरक पडल्याचे त्याने कबूल केले. ‘‘अनुभवी खेळाडू जेव्हा मैदानावर असतात, तेव्हा त्यांना वारंवार सांगता येत नाही, पण युवा खेळाडूंना तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते सांगता येते. मैदानावर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात,’’ हे भारताच्या विजयाचे गुपित धोनीने रविवारी उलगडले.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा विचार केल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या कांगारूंच्या संघाचा आत्मविश्वास मुळातच खचलेला होता. इंग्लिश संघाने मॉन्टी पनेसार आणि ग्रॅमी स्वान या दोन फिरकी गोलंदाजांच्या बळावर भारताशी टक्कर देत मैदान जिंकले. ती करामत क्लार्कला का साधता आली नाही? पहिल्या कसोटीत ४८ तास अगोदरच संघ जाहीर करण्याची घाई करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजीवरील विश्वास तसूभरही कमी झाला नव्हता. तिसऱ्या कसोटी सामन्याअगोदर प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्या शिस्तीमुळे उपकर्णधार शेन वॉटसन, मायकेल जॉन्सन, जेम्स पॅटिन्सन आणि उस्मान ख्वाजा यांना वगळण्यात आले. खेळाडूंपेक्षा क्रिकेट मोठे असते आणि शिस्त ही त्याहूनही महत्त्वाची, हे ऑस्ट्रेलियाने आपल्या कृतीतून दाखवले. त्यामुळे जशी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनी आणि सेहवाग यांच्यातील वादाची खमंग चर्चा झाली, तशीच भारत दौऱ्याच्या उत्तरार्धात अख्खा ऑस्ट्रेलिया संघ खचलेला आणि मानसिकदृष्टय़ा विखुरलेला जाणवला. त्यामुळे जिंकण्याची वृत्ती अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा संघ हरवून बसला होता.
धोनी आणि क्लार्क दोघेही उमदे कर्णधार. बऱ्याचदा आपल्या फलंदाजीद्वारे संघाला कठीण परिस्थितीतून सावरल्यामुळे आपली वेगळी ओळख या दोघांनी जपलेली. पण एकाच नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तसेच सुख-दु:खाचे असते. गतवर्षी क्लार्ककडे मालिका विजयामुळे जे ‘चार दिवस सुखाचे’ आले होते, ते आता ‘सुखाशी भांडतो आम्ही’ अशा शोकांतिकेत परिवर्तित झाले आहे. तूर्तास, ‘दिस जातील, दिस येतील’ अशी गेले अनेक दिवस चातकाप्रमाणे आशा बाळगणाऱ्या भारताच्या वाटय़ाला चांगले दिवस आले आहेत, ‘जीवनाची ही घडी अशीच राहू दे..’ हीच आशा सध्या समस्त भारतीय क्रिकेटरसिक बाळगत आहेत.