मारिया शारापोव्हाची सेरेनाविरुद्धची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. मात्र या दोघींमध्ये रंगणारे द्वंद्व टेनिसरसिकांसाठी पर्वणीच असते. पण कोर्टवरचे हे वैर खेळासाठी चांगले असते, असे उद्गार मारिया शारापोव्हाने काढले. या वैरामुळे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रेरणा मिळते, असेही तिने पुढे सांगितले. सेरेनाविरुद्धच्या ११ लढतींपैकी ९ वेळा शारापोव्हाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
सेरेना एक महान खेळाडू आहे. कारकीर्दीत तिच्या नावावर असंख्य जेतेपदे आहेत. तिच्याविरुद्ध खेळताना नेहमीच कौशल्याचा कस लागतो. अशा स्वरूपाचे वैर चांगले असते. अझारेन्काविरुद्ध रंगणाऱ्या चुरशीच्या सामन्यांबाबत विचारले असता शारापोव्हा म्हणते, ती एक चांगली खेळाडू आहे. तिच्याविरुद्ध मला सर्वोत्तम प्रदर्शन करायचे आहे.