धोनीसेनेची वाताहत.. भारताने पुन्हा टाकली नांगी.. भारताच्या पदरी पराभवाची नामुष्की.. अशा आशयाच्या बातम्या आता नित्यनेमाच्या झाल्यात. क्रिकेट विश्वचषक विजयानंतर आनंदाचे फारच मोजके क्षण भारताच्या वाटय़ाला आलेत.. एकीकडे ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या माथ्यावर कर्णधारपद गमावण्याची असलेली टांगती तलवार तर दुसरीकडे क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या चर्चेला आलेला महापूर.. सगळीकडे अतिक्रिकेटची बोंब सुरू आहे.
वर्षांकाठी ३००पेक्षा जास्त दिवस क्रिकेट एके क्रिकेट खेळणारे खेळाडूही अप्रत्यक्षपणे अतिक्रिकेटविषयी नाकं मुरडताना दिसतात. आपल्या कुटुंबियांना वेळ देण्यासाठीही त्यांच्याकडे उसंत नसते. म्हणूनच एखाद्या मालिकेतून विश्रांती घेऊन ते आपली हौस भागवताना दिसतात. पूर्वी क्रिकेट सामन्यांसाठी सुट्टी घेणारे दर्दी क्रिकेटरसिकही आता बारा महिने रंगणाऱ्या क्रिकेटला पुरते वैतागले आहेत. भारतीय संघाचे मायदेशातील किंवा परदेशातील दौरे, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग या ‘सक्ती’च्या स्पर्धा.. असा वर्षभर भरगच्च कार्यक्रम असणाऱ्या क्रिकेटचे सामने किती दिवस पाहायचे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तरीही एक मालिका संपली की काही दिवसानंतर भारतीय संघासाठी आणखी एका नव्या मालिकेची पर्वणी ठेवलेली असते. क्रिकेटच्या या अतिरेकामुळे अन्य खेळ आता बरेच मागे पडू लागले आहेत, याची जाणीव काही जणांना होऊ लागली आहे. म्हणूनच ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमात ‘क्रिकेटचा अतिरेक होतोय का?’ या परिसंवादात क्रीडाक्षेत्रातील मान्यवर मंडळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणार आहेत. बुधवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट येथे निमंत्रितांसाठी होणाऱ्या या कार्यक्रमात महिला विश्वचषक कबड्डी संघाच्या सदस्या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे, महाराष्ट्र नेमबाजी संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षा शीला कनुंगो, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत, झोपडीवजा घरातून आंतरराष्ट्रीय हॉकीपटू होण्याचे स्वप्न बघितलेला आणि ते यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवणारा युवराज वाल्मीकी तसेच क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आणि मल्लखांब प्रशिक्षिका नीता ताटके अशी दिग्गज मंडळी आपली मते आणि अनुभव कथन करणार आहेत.