धडाकेबाज विजयासह बाद फेरीत प्रवेश; रशियाचे आव्हान संपुष्टात

एपी, कोपनहॅगन

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी मध्यरात्री झालेल्या ‘ब’ गटातील दोन्ही लढतींकडे एकाच वेळी नजर ठेवताना चाहत्यांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र बेल्जियम-फिनलंड यांच्या तुलनेत पार्कन स्टेडियमवर झालेल्या डेन्मार्क विरुद्ध रशिया सामन्याने रसिकांची मने जिंकली.

प्रमुख आक्रमणपटू ख्रिस्तियन एरिक्सनच्या घटनेतून प्रेरणा घेत डेन्मार्कने देशवासीयांना दिलेले वचन पूर्ण करताना रशियावर ४-१ असा शानदार विजय मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली. रशियाला मात्र गटात चौथ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

फिनलंडविरुद्ध १२ जून रोजी झालेल्या लढतीत हृदयविकाराच्या झटक्यामुळे एरिक्सन मैदानातच कोसळला. या घटनेचा डेन्मार्कच्या कामगिरीवरही परिणाम झाला. फिनलंड आणि बेल्जियमविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे डेन्मार्कला अखेरच्या साखळी सामन्यात रशियावर मोठय़ा फरकाने विजय मिळवणे अनिवार्य होते. त्याशिवाय अन्य लढतीत बेल्जियमने सरशी साधणे गरजेचे होते.

प्रत्यक्ष सामन्यात मात्र डेन्मार्कने दडपण झुगारून खेळताना एकामागून एक गोल लगावले. मिकेल डॅम्सगार्ड (३८वे मिनिट), युसूफ पॉलसेन (५९ मि.), आंद्रेस ख्रिस्टेन्सन (७९ मि.) आणि जोकिम माहेल (८२ मि.) या चौघांनी डेन्मार्कसाठी प्रत्येकी एक गोल केला. रशियासाठी कर्णधार अर्टेम झ्युबाने ७०व्या मिनिटाला पेनल्टीवर एकमेव गोल नोंदवला.

विशेषत: २५ वर्षीय ख्रिस्टेन्सनने पेनल्टी क्षेत्राबाहेरून लगावलेला भन्नाट गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. त्याच्या गोलमुळे रशियाच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आल्याने स्टेडियममधील चाहत्यांनी तसेच डेन्मार्कच्या सर्व खेळाडूंसह संघ व्यवस्थापनातील सदस्यांनी जेतेपद पटकावल्याच्या आवेशात जल्लोष केला. या विजयामुळे डेन्मार्कने तीन सामन्यांत तीन गुणांसह ‘ब’ गटात दुसरे स्थान मिळवले. शनिवारी होणाऱ्या बाद फेरीतील लढतीत डेन्मार्कची वेल्स संघाशी गाठ पडणार आहे.

अग्रस्थानासह बेल्जियम बाद फेरीत

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या बेल्जियमने लौकिकाला साजेसा खेळ करताना फिनलंडवर २-० अशी मात केली. लुकास रॅडिकीने ७४व्या मिनिटाला केलेल्या स्वयंगोलमुळे बेल्जियमने आघाडी मिळवली. त्यांनतर ८१व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने स्पर्धेतील तिसरा आणि संघासाठी सामन्यातील दुसरा गोल नोंदवून बेल्जियमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गटात तीनही सामने जिंकून बेल्जियमने सर्वाधिक नऊ गुण कमावले. तर तीन सामन्यांत फक्त एका विजयाचे तीन गुण नावावर असणाऱ्या फिनलंडला स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी त्यांना अन्य गटांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.