अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने खास विक्रमाची नोंद केली आहे. मैदानात पाऊल ठेवताच मॉर्गन इंग्लंडसाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा तिसरा टी-20 सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

या खास विक्रमासह, मॉर्गन 100 किंवा अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील चौथा खेळाडू ठरला. या विक्रमात प्रथम क्रमांकावर बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन, दुसर्‍या क्रमांकावर भारताचा रोहित शर्मा तर, तिसर्‍या क्रमांकावर न्यूझीलंडचा रॉस टेलर आहे. 2009 मध्ये म्हणजेच १२ वर्षांपूर्वी मॉर्गनने नेदरलँड्स संघाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मॉर्गन इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 100 सामन्यांमध्ये 2306 धावा केल्या आहेत. यात त्याने 14 अर्धशतके झळकावली आहेत. 99 ही त्याची टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

आजच्या सामन्यासाठी संघात बदल

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी एक-एक बदल केला आहे. भारतीय संघात सूर्यकुमार यादवच्या जागी रोहित शर्माला तर, इंग्लंड संघात टॉम करनच्या जागी मार्क वूडला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहितला विश्रांती देण्यात आली होती. उभय संघातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.