युवा धावपटू हिमा दास नंतर १७ वर्षीय सायकलपटू इसोव अल्बानने तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी करुन दाखवली आहे. इसोवने स्वित्झर्लंड येथे सुरु असलेल्या ज्यूनियर ट्रॅक सायकलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत केइरीन प्रकारात रौप्यपदक विजेती कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावरील महत्वाच्या स्पर्धेत ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.

इसोवचे सुवर्णपदक फक्त ०.०१७ सेकंदाच्या फरकाने हुकले. झेक प्रजासत्ताकच्या जाकूब स्टॅस्टनीने सुवर्णपदक मिळवले. इसोव अल्बान अंदमान-निकोबारचा रहिवासी आहे. भारतासाठी आणि माझ्यासाठी हे खूप मोठे पदक आहे असे इसोवने शर्यतीनंतर सांगितले. कझाकस्तानच्या अँड्री चूगायला कांस्यपदक मिळाले.

सायकलिंग विभागाचे प्रशिक्षक आरके शर्मा तसेच अविरत मेहनत घेणाऱ्या सायकलपटूंचे मी मनापासून आभार मानतो असे सायकलिंग फेडरेशनचे ऑफ इंडियाचे सचिव ओमकार सिंह यांनी जर्काता येथून बोलताना सांगितले. जागतिक सायकल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.

इसोव एक प्रतिभावान सायकलपटू आहे. एशियन ट्रॅक चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्याने उत्तम कामगिरी केली होती. ज्यूनियर स्तरावरील स्प्रिंट सायकलपटूंमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. मी सुवर्णपदक जिंकू शकलो असतो पण रौप्यपदकावर समाधानी आहे असे अंदमान-निकोबार येथे राहणाऱ्या इसोवने सांगितले. मागच्या महिन्यात हिमा दासने इतिहास रचला होता. IAAF वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिला भारतीय महिला आहे.