फोब्जच्या यादीत सर्वात श्रीमंत स्पोटर्स क्लब म्हणून नोंद असलेल्या ‘रिअल माद्रिद’ फुटबॉल संघाचे होमग्राऊंड  ‘इस्टेडिओ सॅन्टीगो स्टेडियम’सुद्धा आधुनिक रुपडे धारण करण्यास सज्ज झाले आहे. स्थापत्यशास्त्रातील नावाजलेल्या एका जर्मन कंपनीने या स्टेडियमची काळानुरूप आधुनिक पुर्नबांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. फुटबॉल जगतात वैभवशाली इतिहास असलेल्या रिअल माद्रिद संघाच्या या घरगुती मैदानाचे पुर्नबांधणीचे हे काम २०२० सालापर्यंत पूर्ण होणार असून प्रस्तावित स्टेडियमचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्टेडियमला अत्याधुनिक साज देण्यात येणार असून स्टेडियमचा संपूर्ण बाहेरील भाग डिजीटलाईज करण्याचा मानस आहे. काचेसारख्या पारदर्शक अशा स्टेडियमच्या बाहेरील भूभागावर रिअल माद्रिद संघाच्या इतिहासाची आठवण करुन देणारी क्षणचित्रे फुटबॉल चाहत्यांना पाहता येणार आहेत.  तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल्स देखील स्टेडियमचाच भाग असणार आहेत. या प्रस्तावित स्टेडियमचा व्हिडिओ पाहता ‘इस्टेडिओ सॅन्टीगो स्टेडियम’ आगामी काळात संपूर्ण जगासमोर स्टेडियम्सच्या स्थापत्यशास्त्रातील मानबिंदू ठरेल एवढे मात्र नक्की..