सुप्रिया दाबके

गेले काही दिवस अनुभवत असलेल्या बोचऱ्या थंडीतही रविवारी मुंबईकरांचा मॅरेथॉनमध्ये धावण्याचा उत्साह कमी झालेला नव्हता. एकूण ५५ हजार स्पर्धकांचा सहभाग असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्येही आफ्रिका खंडातील धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुषांच्या एलिट प्रकारात इथिओपियाच्या धावपटूंनी मॅरेथॉनमधील विक्रमी वेळ नोंदवत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके पटकावली. २:०८:०९ सेकंद अशा विक्रमी वेळेत इथिओपियाच्या देरारा हुरिसाने सोनेरी कामगिरी केली. भारताकडून पुरुषांमध्ये श्रीनू बुगाता तर महिलांमध्ये सुधा सिंग पहिली आली. सुधा सिंगने सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली.

इथिओपियाच्या देराराने सोनेरी कामगिरी केल्यानंतर पुरुषांमध्ये दुसरा क्रमांक इथिओपियाच्याच आयले अब्शेरोने (२:०८:२० सेकंद) पटकावला, तर बरानाहू तेशोमेने (२:०८:२६ सेकंद) कांस्यपदक मिळवले. याआधी मॅरेथॉन विक्रम इथिओपियाच्याच गिदोन किपकेटरच्या नावावर २०१६मध्ये नोंदवला गेलेला २:०८:३५ सेकंदांचा विक्रम देराराने मोडला. महिलांच्या एलिट गटातही इथिओपियाचेच वर्चस्व राहिले. आमने बेरिसोने २:२४:५१ सेकंद या वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर हेवन हैलूने (२:२८:५६ सेकंद) कांस्यपदक आणि केनियाच्या रोध जेपकोरीर्नेने (२:२७:१४ सेकंद) रौप्यपदक मिळवले.

अपेक्षेप्रमाणे यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्येही भारताकडून पुरुषांमध्ये श्रीनू बुगाताने पहिला क्रमांक मिळवला. एकूण क्रमवारीत श्रीनूचा ५१वा क्रमांक आहे. त्याने २:१८:४४ सेकंद अशी वेळ घेतली. पुरुषांमध्ये दुसरा क्रमांक शेर सिंगने २:२४:०० सेकंद वेळेसह तर तिसरा क्रमांक दुर्ग बहादूर बुधाने २:२४:०३ सेकंद वेळेसह मिळवला. भारताकडून महिलांमध्ये सुधा सिंगने २:४५:३० सेकंद वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. एलिट महिलांमध्ये सुधाचा आठवा  क्रमांक आहे. त्याखालोखाल ज्योती गवतेला २:४९:१४ सेकंद वेळेसह दुसरा क्रमांक आहे. तिसरा क्रमांक श्यामली सिंगने २:५८:४४ वेळेसह मिळवला.

मॅरेथॉनमध्ये एलिट गटात धावणाऱ्या धावपटूंना पाहण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी रस्त्यांवर अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्साही गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे मॅरेथॉनमध्ये राजकारण क्षेत्रातील नेतेमंडळी आणि बॉलीवूडची मंडळी उपस्थित होती. त्यामुळे मुंबईचे वातावरण मॅरेथॉनमय झाले होते.

अर्धमॅरेथॉनमध्ये पारूल चौधरी, तीर्थ पूनची बाजी

अर्धमॅरेथॉन प्रकारात आतापर्यंत महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व असायचे. मात्र मुंबई मॅरेथॉनच्या १७व्या पर्वात या परंपरेला छेद मिळाला. भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पारूल चौधरीने महिलांमध्ये तर पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या तीर्थ पून यांनी बाजी मारली.

पारूलने १.१५.३७ सेकंद अशी वेळ देत नव्या स्पर्धा विक्रमाची नोंद केली. तिने कविता राऊतचा १.१६.३७ सेकंदाचा विक्रम मागे टाकला. नाशिकच्या एकलव्य अकादमीच्या आरती पाटील आणि मोनिका आथरे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले. आरतीने १.१८.०३ सेकंदांत ही शर्यत पार केली, तर दुखापतीतून पुनरागमन करत मोनिका आथरेने १.१८.३३ सेकंद अशी वेळ देत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.

पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन गटात आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवले. तीर्थने १.०५.३९ सेकंदांसह आरामात २१ किमीचे अंतर पार करत विजेतेपदाला गवसणी घातली. मान सिंगने १.०६.०६ सेकंदांसह दुसरे तर बलिआप्पा एबी याने १.०७.११ सेकंदांसह तिसरे स्थान पटकावले.

मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक विजेत्याला मोठी रक्कम मिळते. मात्र माझे पैशांपेक्षा स्पर्धेवर अधिक लक्ष असते. कारण खेळाडू म्हणून स्पर्धा जिंकण्यावर अधिक भर असतो. त्यासाठीच सातत्याने मेहनत घेत असतो.

– देरारा हुरिसा, पुरुषांमध्ये सुवर्णपदक विजेता

शर्यतीच्या सुरुवातीला माझ्यावर अतिशय दडपण होते. परंतु ३१ किमी अंतर धावल्यानंतर आत्मविश्वास उंचावत गेला आणि ३६ किमी अंतरानंतर पदकाची खात्री निर्माण झाली. विजयरेषेपासून एक किमी अंतरावर असताना पेसमेकर सिल्व्हेस्टर किपटोने घडय़ाळ दाखवत विक्रम साकारू शकतेस, याची कल्पना दिली. परंतु थकव्यामुळे मी विक्रमी वेळ साधू शकली नाही.

-आमने बेरिसो, महिलांमधील सुवर्णपदक विजेती

२२ किलोमीटरपर्यंत मी सुधा सिंगबरोबरच होते. परंतु पाणी प्यायला थोडे थांबले, तेव्हा सुधाने आघाडी घेतली. नंतर वेळेचे गणित मला साधता आले नाही. – ज्योती गवते, भारतीय महिलांमध्ये द्वितीय

हॅटट्रिकअपेक्षित होती. यावेळेस धावण्याचा मार्ग थोडा वेगळा होता, पण चांगल्या आयोजनामुळे कोणतीही अडचण आली नाही. हवामानही चांगले होते, त्याचादेखील पळताना फायदा झाला.

– सुधा सिंग, भारतीय महिलांमध्ये प्रथम