मार्च २०१५पासून अपराजित राहिलेल्या गतविजेत्या स्पेनला युरो चषक स्पध्रेपूर्वीच्या अखेरच्या सराव सामन्यात दुबळ्या जॉर्जियाकडून पराभव पत्करावा लागला. घरच्या मैदानावर जॉर्जियाकडून १-० असा झालेला पराभव स्पेनसाठी धोक्याचा इशारा म्हणावा लागेल. जागतिक क्रमवारीत १३७व्या स्थानावर असलेल्या जॉर्जियाचा गत ऑक्टोबर महिन्यानंतरचा हा पहिलाच विजय आहे. युरो पात्रता स्पध्रेत त्यांनी जिब्राल्टरवर मात केली होती.
गतजिवेत्या स्पेनविरुद्ध खेळताना जॉर्जियाने कोणतेही दडपण न बाळगता आक्रमकतेने खेळ केला. ४०व्या मिनिटाला टॉर्निक ओक्रिएश्विलीने गोल करून जॉर्जियाला पुढील बाकावर आणून बसवले. त्याच्या या गोलमुळे जॉर्जियाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि संपूर्ण सामन्यात त्यांनी वर्चस्व गाजवत बलाढय़ स्पेनला पराभूत करण्याची किमया साधली.
या निकालामुळे स्पेनच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला, तसेच जॉर्जियाची दखल घेण्यासही भाग पाडले.